पुणे जिल्ह्यात काँग्रेस हद्दपार? पिढीजात ‘शिलेदारां’ची भाजपची चाचपणी; अजितदांदाना शह देण्यास उपयोग

0

पुरंदर-हवेलीचे संजय जगताप आणि भोर-राजगड-मुळशीचे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे माजी आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीला लागले असून, त्यांनी भाजप प्रवेशासाठी चाचपणी सुरू केली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या भाजपमध्ये चांगलाच जम बसविलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जगताप, थोपटे यांच्या भाजपप्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या जगताप, थोपटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती अत्यंत बिकट होणार असली, तरी या दोघांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, नेते यांचा विरोध होत आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने तसेच जिल्ह्यात अजित पवार यांच्याशी सामना करावा लागणार असल्याने राजकीय शक्ती आवश्यक असल्याने पवार, थोपटे यांनी थेट भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

भाजपा कार्यकर्ते, नेत्यांचा विरोध असला तरी हे दोन नेते भाजपमध्ये सहभागी झाल्यास जिल्ह्यातून काँग्रेस जवळपास हद्दपार होईल. आणि आगामी राजकारणात अजित पवार यांना शह देण्यासाठी या दोन शक्तीशाली नेत्यांचा उपयोग होऊ शकतो. असा विचार करून भाजपा पक्षश्रेष्ठी त्यांच्या प्रवेशाबाबत विचार करत आहेत.

संग्राम थोपटे यांना त्यांच्या ताब्यातील राजगड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या कर्जाची अत्यंत आवश्यकता आहे. अजित पवार यांनी हे मंजूर झालेले कर्ज अडवून ठेवले आहेत. थेट बलशाली सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हे कर्जही लगेच मंजूर होईल आणि आगामी काळात पवारांशी दोनहात करण्यासाठी ताकदही मिळेल, अशी थोपटे यांची धारणा झाली असून, भाजपप्रवेशासाठी त्यांनी आपल्याजवळच्या कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतल्याचे समजते.

संजय जगताप यांचीही राजकीय स्थिती विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे अडचणीची झालेली आहे. त्यातच शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी निवडणुकीत विजय मिळविल्याने त्यांच्यासारख्या बलाढ्य नेतृत्वाशी लढत देण्यासाठी त्यांनाही भाजपची गरज आहे.

पुरंदरमध्ये भाजप निष्ठावंतांचा माजी आ. जगतापांना नकार

भारतीय जनता पक्षाच्या पुरंदर-हवेली तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍यांचा मात्र संजय जगताप यांच्या प्रवेशाला कडवा विरोध आहे. संजय जगताप यांच्या भाजपप्रवेशाने पुरंदरचा स्थानिक भाजपचा निष्ठावंत गट भाजप सोडून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये अलीकडच्या काळात आयारामांची संख्या खूप वाढली आहे. या इतर पक्षांतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे काम करणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र अडगळीत टाकण्यात येत असल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये वाढीला लागत आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष व पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप त्यांच्या सहकार्‍यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाच्या चर्चा सध्या पुरंदर-हवेलीतील रंगल्या आहेत.

यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेतून आलेल्या मंडळींनी भाजपमध्ये चांगलेच बस्तान बसविले आहे. संजय जगताप यांचा भाजपप्रवेश झाल्यास पुरंदरच्या या स्थानिक नेत्यांचे स्थान डळमळीत होणार आहे. यात राष्ट्रवादीतून जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, माजी आमदार अशोक टेकवडे तसेच मनसेतून आलेले बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. जगताप यांनी भाजपप्रवेश केला, तर संजय जगताप यांनी भाजप पक्षात नक्की काय करायचे, असा प्रश्न निर्माण केला आहे. आगामी निवडणुकीत महायुती न झाल्यास पुरंदर-हवेलीतून लढण्यासाठी हे सर्वजण इच्छुक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतच ही मंडळी इच्छुक होती. परंतु, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेल्याने पक्षाचा आदेश मानून त्यांनी महायुतीचे काम केले आहे. आता संजय जगताप जर पक्षात आले तर या मंडळींची पक्षीय पातळीवरच मोठी गोची होणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे.

थोपटेंना भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

भोरचे माजी आमदार काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात असलेले संग्राम थोपटे फक्त स्वफायद्यासाठी भाजपात येत असल्याने त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी घेतली आहे.

काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणार्‍या भोर मतदारसंघावर थोपटे पिता-पुत्रांचा गेल्या 47 वर्षांचा सत्तेचा झेंडा गेल्या विधानसभा निवडणुकीत खाली आला आहे. राज्यात सत्ता नाही, मतदारसंघात पराभव, यामुळे थोपटे यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राजगड सहकारी साखर कारखाना पुनर्जीवित करण्यासाठी एनसीडीसीच्या 81 कोटी रुपयांच्या कर्जासाठी, राजगडच्या इतर प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी, राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या जागेच्या अडचणी, आंबेघर येथील स्टोनक्रशरला होत असलेला विरोध, अखेरचा श्वास घेत असलेली भोर कृषी बाजार समिती, खरेदी-विक्री संघ विकसित करण्यासाठी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदधिकार्‍यांनी केलेल्या आरोपांना स्थगिती देण्यासाठी, राजकीय अस्तित्व, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपप्रवेश करण्यासाठी थोपटे यांनी भोर मतदारसंघातील काँग्रेस पदधिकार्‍यांच्या मतांची चाचपणी केली आहे.

भोर राजगड तालुक्यातील भाजप पदधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा मात्र थोपटे यांच्या भाजपप्रवेशाला विरोध होत आहे. थोपटे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच यायला हवे होते. आता वराती मागून घोडे कशाला? अशा प्रतिक्रिया भाजप पदाधिकार्‍यांत आहे. अनेक वर्षे राजकारणात प्रस्थापित सत्ताधारी थोपटे यांच्याशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघर्ष केलाय. आता थोपटे यांची गरजच आपल्याला नाही. यासाठी भाजप भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, जिल्हा शिक्षक अध्यक्ष विलास बांदल, कार्यकारी सदस्य विश्वास ननावरे, भोर अध्यक्ष सचिन कन्हेरकर, माजी अध्यक्ष सचिन मांडके, राजगड अध्यक्ष राजू रेणुसे, जिल्हा उपाध्याक्ष अण्णा देशमाने, सुनील जागडे, नाना साबणे, कैलास बिरामणे, अण्णा शिंदे, देविदास हणमघर, मुळशी अध्यक्ष राजूभाऊ वाघ, सरचिटणीस सुनील शिंदे, हनुमंत चव्हाण, जिल्हा उपाध्याक्ष विनायक ठोंबरे, वैशाली सणस, अलका ववले व सर्व पदधिकार्‍यांनी प्रवेशास विरोधक दर्शविला आहे.

याबाबत लवकरच भोर-राजगड-मुळशीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटून थोपटे यांना आपल्या भाजप पक्षात घेऊ नये, असे निवेदन देणार आहेत.