कराडच्या समर्थकांचा गोंधळ, घोषणाबाजी; बीडमध्ये पोलिसांकडून ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

0

खंडणी, मकोका कायद्याखाली अटक असलेल्या आणि आता संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडी मिळालेल्या वाल्मीक कराडला बुधवारी न्यायालयात आणल्यानंतर त्याच्या समर्थकांनी गर्दी केली. त्याला कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या, तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने त्याच्याविरोधात त्याला नेत असलेल्या पोलिस वाहनाकडे जात निषेधाच्या घोषणा दिल्या. दोन्ही बाजूच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खंडणी प्रकरणात अटक केल्यानंतर वाल्मीक कराडवर मंगळवारी मकोका कायद्याने गुन्हा नोंद करून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी त्याचा ताबा घेण्याची परवानगी एसआयटीला देण्यात आली. त्यामुळे त्याला बुधवारी येथील विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले.

सुरवातीपासून त्याच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती मिळताच त्याच्या समर्थकांनी त्याच्या बाजूने घोषणा सुरू केल्या. त्याला पोलिस व्हॅनमध्ये कोर्टाबाहेर आणत असताना गोंधळ घालण्याचाही प्रकार घडला. त्यावेळी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले, तर दुसऱ्या बाजूला त्याला नेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अॅड. हेमा पिंपळे घोषणा देत त्या वाहनाकडे निघाल्या. पोलिसांनी अडविल्यानंतरही त्या जबरदस्तीने वाहनाच्या दिशेने जात असल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

बीड : कराडला जिल्हा न्यायालयात आणल्यानंतर आंदोलनातून झालेल्या गोंधळप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. घोषणाबाजी व गोंधळ घातल्याप्रकरणी सुनील श्रीरंग फड (रा. परळी), ज्ञानोबा दगडू मुंडे (रा. उखळी ता गंगाखेड, जि. परभणी), जीवन माणिक कराड (रा. पिराचीवाडी, ता. केज) व इतर ३० ते ३५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक विलास श्रीमंतराव मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली. तर पोलिसांच्या वाहनासमोर जात त्यांच्याविरोधात घोषणा व गोंधळ घातल्याने हेमा पिंपळे, मनीषा कुपकर, संगीता कोकाटे व इतर १० ते १२ महिलांवर निता दामधर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दिवसभरात कुठे काय घडले

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परळी, बीड व केज शहरांसह अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

परळी शहरातील व्यापारपेठ दुसऱ्या दिवशीही बंद होती.

पांगरी कॅम्प (ता. परळी) येथे कराड समर्थक महिलांनी ठिय्या आंदोलन केले. तर तरुण मोबाईल टॉवर चढले. घोषणाबाजी करण्यात आली.

वाल्मीक कराडला विशेष मोकका न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले.

विशेष मोकका न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर कोठडीबाबत सुनावणी झाली.

दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दोन तास युक्तिवाद चालला.

न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा वाल्मीक कराडची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

न्यायालय परिसरात कराड समर्थकांनी घोषणा दिल्या.

वडगाव ढोक (ता. गेवराई) येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.

जमावबंदीत आंदोलन कसे?’

बीड, ता. १५ : बीडमध्ये ता. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू आहेत. तरीही परळीत आंदोलन कसे झाले, हिंदू सणाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेवून त्यांना सगळा वृत्तांत देणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. अपहरण करताना वापरलेली कार कोणाची, मारेकऱ्यांना राहायला कोणी घरे दिली, या सगळ्या गोष्टी तपासात स्पष्ट होतील. खंडणीमधील जे आरोपी होते, ते कोणाच्या घरात होते, त्यांना कोणी गाड्या पुरवल्या हे सगळे समोर येईल आणि त्यांचाही हिशोब होईल, असेही सोनवणे म्हणाले