मतदारयाद्या सदोष असून यात बोगस मतदार घुसविण्यात आले आहेत, असा आरोप करत सर्वपक्षीय विरोधकांनी त्याविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह ‘मविआ’च्या घटक पक्षांचे प्रमुख नेते करणार आहेत. मतदार यादीवरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुतीला लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षांनी यानिमित्ताने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांची रविवारी शिवसेना भवन येथे संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षाचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, भाकपचे प्रकाश रेड्डी आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोर्चाची घोषणा करण्यात आली. यावेळी संजय राऊत म्हणाले,”राज्याच्या यादीतील ९६ लाख मतदार आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत.
या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. आम्ही आमची भूमिका मांडली, मात्र निवडणूक आयोग मानायला तयार नाही. याद्या निर्दोषच आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केलेले आहे. त्यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल. त्यासाठीच हा मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सांगतात मतदार यादीत बोगस आणि दुबार मतदार आहेत. निवडणुकीत याद्यांत गैरप्रकार करून हे लोक सत्तेवर आले आहेत. मतदार याद्या पवित्र शुद्ध हव्यात यासाठी हा संघर्ष आहे.”
मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ही भावना केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर त्या राज्यातील सर्व जनतेची झाल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. हा घोळ निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेला असतानाही ते डोळेझाक करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा काढला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सपकाळांनी बैठक टाळली
”देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची पाठराखण करत आहेत,” असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला सपकाळ यांनी जाणे टाळले. मात्र पक्षाचे मुख्य प्रवक्ता सचिन सावंत या बैठकीला उपस्थित होते.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण…
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केल्याचा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ”या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या. हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही,” असे सपकाळ म्हणाले.
आमचे आक्षेप लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा मोर्चा काढायचा ठरवले आहे. सत्तेत असणारे लोकही या मोर्चात सहभागी झाले तर कुणाची ना नाही. पण अशा चुकीच्या, चोरीच्या वाटेने मतदार घुसवलेल्या यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चात येणार नाहीत.
– जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे करण्यात आलेले आहेत. मतदारांची वाढलेली संख्या ही सुद्धा अनाकलनीय आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी उत्तरे समाधानकारक नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कठसूत्री बाहुल्यासारखी झाली आहे.
– हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस











