पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाची पंढरी असताना वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरूडचे गत वैभव लयास गेल्याची भीती लाडक्या बहिणींना वाटत असून आपलं कोथरूड पूर्ववत करण्यासाठी गिरीश गुरनानी अध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.






राज्याच्या व देशाच्या आर्थिक यंत्रणेचा एक प्रमुख भाग पुणे शहरात आहे. येथे अनेक युवा तसेच अबालवृद्ध अवघ्या महाराष्ट्रातून येतात व आपापल्या परीने कष्ट करून जीवन जगण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी धडपडत असतात. या सुसंस्कृत पुण्याचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू कोथरूड परिसर मानला जात होता; परंतु नव्या घडणाऱ्या घटनांमुळे रेखीव संस्कृत कोथरूड लयास जाण्याची भीती स्थानिक नागरिकांना वाटत आहे. कोथरूड हा परिसर पुण्याच्या सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावतो हे आपणास ज्ञात आहेच. येथे अनेक मध्यमवर्गीय साधी भोळी नागरी वस्ती आपल्या मेहनतीने आपले आयुष्य उभे करतात आणि या कोथरूडला स्वतःची जन्मभूमी कर्मभूमी आणि पुण्यभूमी मानतात. त्यांच्या सुरक्षेचा विचार करून कुठून पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मागच्या काही वर्षात या आपल्या सुंदर सुसंकृत कोथरूडमध्ये गुंडगिरी, गँगवॉर, हफ्ते वसुली, दुकानफोडी, घरफोडी, साखळीचोरी, महिलांवर अत्याचार, कोयता गँग प्रकरण अशा अनेक गुन्हेगारी कृत्यांचा जणू सुळसुळाटच अनुभवायला मिळत आहे. या कृत्यांमुळे सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण होत चालली आहे. आणि हेच या समाजातील अराजक तत्त्वांचे लक्ष्य आहे. या जाचातून जर कोथरूडच्या कर्मवीर आणि कर्तव्यनिष्ठ पुणे पोलिसांनी मुक्त करावे. कोथरूडचे रक्षण करण्याची जबाबदारी परमेश्वराने कोथरूडचे पोलिस निरीक्षक या नात्याने आपल्या खांद्यावर टाकली आहे. या कोथरूडच्या असंख्य सामान्य जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो की कठोरातली कठोर कारवाई करून आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हेगारांचे संबंध कुठल्याही राजकीय पक्षाशी, प्रतिष्ठित व्यक्तींशी किंवा धनाढ्य इसमांशी असले तरीही त्याची कुठलीही गयावया न करता, कोथरूडला या त्रासातून एकदाचे मुक्त करा व कोथरूडला गत वैभव, समृद्धी व शांतता प्राप्त करून द्या. अशी मागणी लेखी निवेदनात करण्यात आली आहे.










