बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे या मागणीसाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे आणि आंदोलन करण्यात येत आहेत. सुरुवातीला या मागणीसाठी बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शनिवारी परभणीत देखील असाच मोर्चा झाला त्यानंतर आज पुण्यामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि या घटनेमध्ये दोषी असलेल्या सर्वांनाच शासन व्हावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या सर्वपक्षीय मोर्चाला बीडमधून अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चाला उपस्थित राहिले होते. असे असले तरी पुणे जिल्ह्यातील मात्र आमदार खासदारांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. सर्वप्रथम बीड येथे मोर्चा काढण्यात आला त्यानंतर शनिवारी परभणी आणि आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. लाल महाल येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी देखील केली होती. या मोर्चात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी मराठा आंदोलकांची भेटीगाठी देखील घेतल्या. माध्यमांशी संवाद देखील साधला. मात्र, त्यांच्या चुलत भावाचा अपघाती निधन झाल्याने त्यांना मोर्चा सोडून परत जावे लागले. त्याच पद्धतीने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आंदोलनात आपली उपस्थिती लावली.
हे सर्व नेते आंदोलनाला उपस्थित राहिले असताना पुणे शहर आणि जिल्ह्यातील मात्र आमदार, खासदार आणि इतर बड्या नेत्यांनी या मोर्चाला उपस्थिती लावणें टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. ना महाविकास आघाडी ना महायुतीच्या आमदार खासदारांनी या मोर्चाला उपस्थिती लावली. पुणे शहरातून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे काही ठराविक नेतेच या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचा पाहायला मिळाले.
या आंदोलनाला उपस्थित राहिलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या पुणे शहरातील अनुपस्थितीत आमदारांची दखल घेत रविवार असल्याने ही मंडळी सुट्टीवर असून ते मोर्चाकडे फिरकले नसल्याबाबत धन्यवाद म्हणत खोचक टोला या आमदार खासदारांना लगावला.