पुणे महापालिकेची बहुप्रतिक्षित महापालिका निवडणूक लवकरच होण्याची संकेत मिळत असून प्रशासकीय स्तरावरच्या सर्व प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असल्याने पुणे महापालिकेचा ‘दिवाळी धमाका’ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक स्तरावरील प्रभाग रचना अंतिम स्वरूपात तयार झाली असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे या आठवड्यामध्ये सर्व प्रभाग रचना जमा होण्याची संकेत निर्माण झालेले आहेत. पुणे महापालिकेच्याही आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत प्रारूप प्रभाग रचनेचे काम आटोक्यात आले असून या अंतिम मसुद्यावर २५ ते ३१ जुलैदरम्यान निर्णय अधिकारी समिती सदस्यांच्या सह्या होणार आहे. त्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला जाणार आहे.






संपूर्ण राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यभर स्थानिक पातळीवरती प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेमध्येही 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार हे निश्चित झाल्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. या गणितानुसार पुणे महापालिकेमध्ये सुमारे 41 प्रभाग तयार करण्यात येणार असून यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सध्या शहरभर प्रभाग रचनेच्या हद्दी २३ ते २४ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करून त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्याचे कामही पूर्णत्वास आल्याने आज किंवा उद्या संबंधित प्रारूप प्रभाग रचना समितींच्या सह्या करून महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारूप ४ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे जमा केल्यानंतर नगर विकास विभागाच्या वतीने गुगल मॅपिंगच्याद्वारेच फेर पडताळणी करण्यात येणार असून काही किरकोळ किंवा निवडक बदलांसह राज्य शासनाच्या नगरविकास भागाकडून ६ ते ११ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास संबंधित अंतिम प्रभाग रचना सादर केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडून २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी पालिकेस सूचना केल्या जाऊ शकतात. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सुनावणी मागविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून ऑगस्ट महिना अखेर अंतिम प्रभाग रचनेवर हरकत यांनी सुनावणी घेण्याच्या आदेश आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर मध्ये संपूर्ण प्रभाग रचना निवडणुकी साठी तयार होणार असल्याने ‘ऑक्टोबर’च्या दिवाळी धमक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.










