मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर आलेत. मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी मराठी भाषेची गळचेपी, सरकारकडून हिंदी लादण्याचा होणारा प्रयत्न, नेत्यांचं शिक्षण यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सन्माननिय उद्धव ठाकरे असं म्हणत सुरुवात केली. व्यासपीठावर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच होते.






बाळासाहेब ठाकरे, राज्यातली जनता यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचं काम फडणवीसांनी केलं असं राज ठाकरे म्हणाले. मराठीकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही. महाराष्ट्र आणि मुंबईला कोण हात लावायला येतं बघतोच अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा दिला.
मोर्चा निघायला हवा होता
खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो याचं चित्र उभा राहिलं असतं. मोर्चाच्या नुसत्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शीवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे त्यामुळे तुम्हाला इथं यावं लागलं.
मराठीकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही
आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता. कोणी कमी हसलं का, कोणी बोलतायत का, आपल्याकडे गोड विषय़ सोडून इतर गोष्टीतच रस असतो अनेकांना. आजचा हा मेळाव्याला कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. मराठीकडे वेड्यावाकड्या नजरेनं बघायचं नाही कोणी.
तुमची सत्ता विधानसभेवर, आमची रस्त्यावर
प्रश्नच अनाठायी होता, कुठून अचानक हिंदीचं आलं कळलं नाही. हिंदी कशासाठी हिंदी? कोणासाठी, लहान मुलांवर जबरदस्ती करतायत तुम्ही. कुणाला विचारायचं नाही, तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आहे आम्ही लादणार… तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात… आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे.
भुसेंचं ऐकून घेतलं पण ऐकणार नाही
एक पत्र लिहिलं, दोन पत्रं लिहिली… नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो ते समजून घ्या, ऐकून घ्या. मी म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादताय, कुठली त्रिभाषा सूत्र आणलं. त्रिभाषा सूत्र फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या दुव्यासाठी. आज कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीतच सगळं होतं. मग मला म्हणाले केंद्रीय शिक्षण धोरण सांगायला लागले. इतर कोणत्याही राज्यात नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतली राज्ये विचारत नाहीत. विनाकारण आणलेला विषय होता. भुसेंना विचारलं मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार कोणती तिसरी भाषा आणणार आहेत?
भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते
हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी भाषा नसलेली राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, हिंदीवाले इकडे येतायत. आणि हे म्हणतायत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं. भाषेबद्दल वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते. एक भाषा उभा करायला खूप परिश्रम लागतात. लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा उभा राहत नसतात. अमित शहा म्हणाले इंग्रजी येते त्याला लाज वाटेल. तुम्हाला येत नाही.
महाराष्ट्राला मुंबईला हात घालून दाखवा
इंग्रजांनी सव्वाशे वर्षे राज्य केलं. मराठा साम्राज्य अटकेपर्यंत गेलं, आम्ही मराठी लादली? हिंदी दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे. कशासाठी आणि काय करायचंय नेमकं, यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का, यासाठी भाषेला डिवचू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्याली त्यांनी पुढे यावं, महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा.
कुठे शिकले याचा काय संबंध
आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. माघार घेतली ना, मग वेगळ्या ठिकाणी प्रकरण वळवायचा प्रयत्न सुरू केला. काय तर म्हणे ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकले. ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. दादा भुसे मराठीमध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले ना? फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध?
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली
कोणा कोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आहेत आमच्याकडं. त्यांच्यातल्या एक एका मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल फेफरं. पण कोण कुठे शिकले असे प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आमची मुलं इंग्रजी मिडीयमध्ये शिकली, हो शिकली. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी मीडियमममध्ये शिकलेत. या दोघांवर मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी, ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का, कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकलेत.
इंग्रजी शाळेत शिकले तरी मातृभाषेचा अभिमान
दक्षिणेकडील राज्यांमध्ये तामिळ, तेलगुच्या प्रश्नावर दक्षिण भारतात उभा राहतात. त्यांना कुठं शिकलात विचारत नाहीत. हिब्रू भाषेत शिकेन आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेन. दक्षिणेतील जयललिता, स्टालिन, कनिमोझी, उदयनिधी, पवन कल्याण, कमल हासन, विक्रम, सूर्या, ए आर रेहमान हे सगळे इंग्रजी मीडियममध्ये कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेत. आपल्या संरक्षण खात्यात वेगवेगळ्या राज्याच्या रेजिमेंट आहेत. तिथं भाषेचा प्रश्न कुठे येतो. शत्रू दिसला की एकत्र मिळून तुटून पडतात.
मराठी माणूस एकत्र आलात, तुम्हाला जातीत विभागतील
तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलायत. पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. मराठी माणसाला एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातीत विभागायला सुरुवात करतील. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारलं. अजून काही केलंच नाही. जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, चूक त्यांची असली पाहिजे. असली गोष्ट कराल तेव्हा व्हिडीओ काढू नका. आपल्याआपल्यातच त्याला कळलं पाहिजे. मारणारा सांगत नसतो, मार खाणारा सांगत नसतो. उठसूठ कुणाला मारायचं नाही.
मराठीचं बाळकडू
मराठीचं बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं. आमच्या धमण्यांमध्ये आलं कुठून, मराठीसाठी कडवट का झालो, यासाठी बाळासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग आहेत. १९९९ मध्ये शिवसेना भाजपचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती, वेगवेगळे लढले होते. त्या वादात काहीच होईना, एके दिवशी मातोश्रीला बसलो असताना दुपारी दोन गाड्या आल्या. पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आले. मी त्यांना सांगितलं बाळासाहेबांची झोपायची वेळ आहे. जावडेकर म्हणाले मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायच ठरलंय. हे त्यांना सांगायचंय. मी म्हणलं काका उठ, मी एकेरीच हाक मारायचो, मी पुन्हा म्हणलं काका उठ, खाली जावडेकर आणि मंडळी आलेत. ते म्हणतायत मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय. बाळासाहेब म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मला त्यावेळी समजलं की मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली.
बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारण्याची अपेक्षा
मराठीसाठी कोणत्याही स्थिती तडजोड होणार नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही सतर्क रहावं. मराठीसाठीची एकजूट कायम रहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.











