“एकत्र दिसणं महत्त्वाचं एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी,,” उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

0

वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो असल्याचं म्हटलं.

वरळीत एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हिंदीच्या विषयावरून जोरदार निशाणा साधला. “आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा धरुन चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात आपण सर्वांनीच या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे, वापरायचं आणि सोडून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणारोत. डोक्यावर शिवसेना प्रमुखांचा हात नसता तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होतं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

भाजप ही अफवांची फॅक्ट्री

“भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय. ९२-९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही हिंदू म्हणून शिवसैनिकांनी मराठी माणसानं वाचवलं. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

काय म्हणाले राज ठाकरे?

“आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत… जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असं राज ठाकरे म्हणाले.