पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सततच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चार मार्गिकांचा नवीन भुयारी कॉरिडॉर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावात दोन मार्गांचा समावेश आहे – शनिवाऱवाडा (काकासाहेब गाडगीळ पुतळा) ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवाऱवाडा.
सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुण्यातील काकासाहेब गाडगीळ पुतळा व शनिवाऱवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे आले असता, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी हा प्रकल्प केंद्रीय निधीतून मंजूर करण्याची विनंती करत प्रस्ताव सादर केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
आमदार रासने म्हणाले की, शिवाजीरोड आणि बाजीराव रोड या पुण्याच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर ऐतिहासिक वास्तू, शाळा, कॉलेजेस आणि बाजारपेठा असल्याने लाखो वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. हे दोन्ही रस्ते उत्तर-दक्षिण दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने, भविष्यातील लिंक कॉरिडॉरचा भाग होऊ शकतात. म्हणूनच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि पुण्याचे ऐतिहासिक वारसास्थळ जपण्यासाठी भुयारी कॉरिडॉर प्रकल्प सादर केला आहे.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चा भाग असल्यामुळे गडकरी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागांशी लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम टप्प्यात आणला आहे. निधीसाठी प्रस्ताव राज्याच्या अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला असून, केंद्र सरकारकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक भुयारी बोगदा सुमारे २.५ किलोमीटर लांब आणि ३० फूट खोल असणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य व केंद्र सरकारकडून संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.