पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर निगडी येथील पुणे गेट हॉटेलजवळ रविवारी पहाटे एका भरधाव टेम्पोने पोलिसांच्या जीपला धडक दिली. या अपघातात तीन मेट्रो वॉर्डन जखमी झाले असून टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
जखमी वॉर्डनची नावे लक्षण शिवाजी शिंदे, साहिल पवार आणि मोहन गंगाधन आऊचर अशी आहेत. अपघातात पोलिसांची बीकन लाइट लावलेली जीपही नुकसानग्रस्त झाली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नारायण कांगुडे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, कांगुडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निगडी वाहतूक विभागात कार्यरत असून, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळवण्याचे काम करत होते. यावेळी रात्री १.१५ च्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने अडथळे तोडून थेट पोलिस जीपला धडक दिली. या जीपची धडक बाजूला उभ्या असलेल्या मेट्रो वॉर्डनना बसली.
पोलिसांनी टेम्पोचालक रोशन रॉय (वय २८, रा. बिहार) याला तात्काळ अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 110, 324(3) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.