पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी बाल न्याय मंडळाकडे केली आहे. आरोपीने मद्यप्राशन केल्यानंतर गाडी चालवून दोन तरुणांचा मृत्यू घडवला असून, त्याला गुन्ह्याचे परिणाम माहिती होते, असा युक्तिवाद करण्यात आला.
सरकारी वकील शिशिर हिराय यांनी सांगितले की, आरोपीने कार चालवू नये, असे सांगितले असतानाही त्याने कार चालवली आणि अपघात घडवला. त्यानंतर ससून रुग्णालयात रक्तनमुना बदलण्याचा प्रयत्न केल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे हा गुन्हा गंभीर असून, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बचाव पक्षाच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला असून, हा गुन्हा पूर्वनियोजित नसल्याचे म्हटले आहे. आरोपी अल्पवयीन असून त्याच्या सुधारासाठी संधी दिली पाहिजे, असा युक्तिवाद करण्यात आला.
या प्रकरणात पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार असून, त्याआधी मानसशास्त्रीय आणि समुपदेशन अहवालाचा विचार करण्यात येणार आहे. १९ मे रोजी पहाटे झालेल्या या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता.