दक्षिण कमांडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अंतर्गत सुरक्षा, नागरी संरक्षण सहकार्य, आपत्ती व्यवस्थापन व माजी सैनिक कल्याण यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ही बैठक लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील उच्चस्तरीय समन्वय बैठकीचा एक भाग होती, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “या बैठकीत राज्याच्या सुरक्षेसाठी लष्करी आणि नागरी यंत्रणांमधील समन्वय, आपत्ती काळातील एकत्रित प्रयत्न, वेटरन आणि वीरनारींसाठी उपक्रम अशा अनेक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी समन्वय अधिक बळकट करण्याच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी एकत्र काम करण्याच्या संकल्पनेला पुनरुच्चार दिला.”
लेफ्टनंट जनरल सेठ यांनी मुंबईतील महाराष्ट्र-गुजरात-गोवा विभाग मुख्यालयालाही भेट दिली. त्यांनी तेथील सैनिकी तयारीचा आढावा घेत आणि नवीन सुरु करण्यात आलेल्या सेक्शन हॉस्पिटल व इंटिग्रेटेड वेटरन्स कॉम्प्लेक्स या सुविधा पाहिल्या. त्यांनी माजी सैनिक आणि वीरनारींशी संवाद साधून त्यांच्याप्रती लष्कराच्या बांधिलकीचे पुनरुच्चारण केले.
दक्षिण कमांडने आपल्या एक्स (X) पोस्टमध्ये नमूद केले की, “ही भेट म्हणजे सैन्य आणि नागरी यंत्रणांमधील दृढ समन्वयाचे प्रतीक असून, महाराष्ट्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कार्यरत आहेत.”