गुजरातचा १५ धावांनी पराभव करत चेन्नई सुपर किंग्सचा दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश

0

चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी गतविजेत्या गुजरात टायटन्सवर १५ धावांनी दमदार विजय मिळवला आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सकडे अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी असणार आहे. मुंबई इंडियन्स – लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामधील विजेत्या संघाशी त्यांना येत्या शुक्रवारी लढावे लागणार आहे.

चेन्नईकडून गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. शुभमन गिल व रिद्धीमान साहा या जोडीने २२ धावांची भागीदारी रचली. दीपक चहरच्या गोलंदाजीवर रिद्धीमान साहा पुलचा फटका खेळताना १२ धावांवर मथीशा पथीरानाकरवी झेलबाद झाला.

त्यानंतर धोनीच्या चतुर नेतृत्वामुळे हार्दिक पंड्याही ८ धावांवर बाद झाला. याप्रसंगी धोनीने लेग साईडचा एक क्षेत्ररक्षक ऑफसाईडला सर्कलमध्ये आणला. माहीश तीक्षणाच्या गोलंदाजीवर हार्दिकने तिथेच फटका मारला. रवींद्र जडेजाने त्याचा झेल टिपला. शुभमन गिल व दसुन शनाका या जोडीने गुजरातसाठी किल्ला लढवला. पण जडेजाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स फटका खेळताना दसुन १७ धावांवर तीक्षणाकरवी झेलबाद झाला. गुजरातने ७२ ते ९८ या धावसंख्येदरम्यान दसुन, डेव्हिड मिलर (४ धावा), शुभमन गिल (४२ धावा) व राहुल तेवतिया (३ धावा) हे फलंदाज गमावले.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

चहरने फॉर्ममध्ये असलेल्या गिलला बाद करीत चेन्नईसाठी मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. राशीद खानने ३० धावांची खेळी केली. गुजरातचा डाव १५७ धावांमध्येच संपुष्टात आला. चहर, तीक्षणा, जडेजा व पथीराना यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद करीत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन धावांवर खेळत असताना ॠतुराज गायकवाड याला दर्शन नाळकंडे याच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. ॠतुराज शुभमन गिलकरवी झेलबाद झाला. मात्र हा नो बॉल होता. त्यानंतर ॠतुराज व डेव्होन कॉनवे या सलामी जोडीने ८७ धावांची भागीदारी करताना गुजरातच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. ही जोडी चेन्नईसाठी मोठी कामगिरी करणार असे वाटत असतानाच मोहीत शर्मा गुजरातसाठी धावून आला. त्याने ॠतुराजला ६० धावांवर बाद केले. त्याने ४४ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार व १ षटकार मारला.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

ॠतुराज बाद झाल्यानंतर चेन्नईच्या धावसंख्येला ब्रेक लागला. चेन्नईमधील एम.ए.चिदमबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगात धावा करणे कठीण होते. चेंडू हळूवारपणे बॅटवर येत होते. चेंडू थांबून येत असल्यामुळे फलंदाजांना मनाजोगते फटके खेळताना अडचण येत होती. वेगवान गोलंदाज ‘स्लोअर वन’ (संथ गतीने) चेंडूंचा अधिक वापर करीत होते. शिवम दुबे (१ धाव), अजिंक्य रहाणे (१७ धावा) व कॉनवे (४० धावा) हे एकामागोमाग एक असे बाद झाले. अंबाती रायुडू व रवींद्र जडेजा या जोडीने चेन्नईच्या धावसंख्येत भर घातली. ९ चेंडूंमध्ये १७ धावा करणारा अंबाती राशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेन्नईत आपला अखेरचा सामना खेळण्याची शक्यता असलेला महेंद्रसिंह धोनीही एक धावेवर बाद झाला. जडेजाने १६ चेंडूंमध्ये २२ धावांची खेळी करीत चेन्नईला २० षटकांत ७ बाद १७२ धावा उभारून दिल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी व मोहीत शर्मा यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स २० षटकांत ७ बाद १७२ धावा (ॠतुराज गायकवाड ६०, डेव्होन कॉनवे ४०, रवींद्र जडेजा २२, मोहम्मद शमी २/२८, मोहीत शर्मा २/३१) विजयी वि. गुजरात टायटन्स २० षटकांत सर्व बाद १५७ धावा (शुभमन गिल ४२, राशीद खान ३०, दीपक चहर २/२९, माहीश तीक्षणा २/२८, रवींद्र जडेजा २/१८, मथीशा पथीराना २/३७).