मुंबई दि. २ (रामदास धो. गमरे) “धम्म हा धर्मापेक्षा वेगळा आहे, धम्म म्हणजे करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि शील. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग; माणसामाणसातील नातेसंबंध कसे असावेत, वर्तन कसं असावं, संवाद कसा असावा, याचं मोलाचं शास्त्र म्हणजे धम्म. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. व्यक्तीच्या चारित्र्य विकासाबरोबरच समाजाच्या परिवर्तनाची शक्ती ही धम्मात दडलेली आहे, २५६५ वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, त्यांनी ८२ हजार स्कंधांचा उपदेश पंचकाय परिव्राजकांना दिला हे स्कंध केवळ तात्त्विक किंवा तार्किक नव्हते, तर ते त्यांनी वैज्ञानिक कसोटीवर तपासले. निरीक्षण, परीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे त्यांनी धम्म सिद्ध केला म्हणूनच आपण निश्चयाने म्हणू शकतो की धम्म विज्ञाननिष्ठ आहे आणि विज्ञान धम्मनिष्ठ आहे. विज्ञानाचा पाया धम्मात आहे आणि धम्माचा पाया विज्ञानात आहे, बुद्धांच्या धम्माचा आधार घेतल्याशिवाय विज्ञानाची खरी दिशा सापडत नाही आणि विज्ञानाच्या पडताळणीशिवाय धम्माचा खरा अर्थ उमगत नाही. हीच बुद्धांच्या विचारांची वैश्विकता आहे ज्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठाने दहा हजार वर्षांचा मानवी इतिहास संशोधनपूर्वक अभ्यासला व ‘मेकर्स ऑफ युनिव्हर्स’ म्हणजेच जगाला आकार देणारे महान व्यक्तींची यादी तयार केली त्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर तथागत भगवान गौतम बुद्ध, द्वितीय क्रमांकावर वर्धमान महावीर, तृतीय क्रमांकावर सम्राट अशोक आणि चतुर्थ क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करण्यात आला, जगाला दिशा देणारे हे महामानव आजही विश्वासाठी दीपस्तंभ ठरले आहेत दीपस्तंभाचा विज्ञाननिष्ठ पाया घालण्याचे काम तथागत गौतम बुद्धांनी केले आहे म्हणूनच संपूर्ण जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक, महान मनोवैज्ञानिक, सुपर सायंटिस्ट, वैज्ञानिकांचे विश्वगुरु आणि मनोचिकित्सक म्हणून मान्यता दिली आहे.” असे प्रतिपादन बौद्धाचार्य संदीप गमरे यांनी बौद्धजन सहकारी संघ आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प गुंफत असताना केले.
बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर आठव्या पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाच्या संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे तालुका सरचिटणीस संदेश गमरे यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी “आदर्श बौद्धाचार्य संदीप गमरे यांनी ‘बौद्ध धम्म आणि विज्ञान’ या विषयावर आपले विचार सरळ साध्या परंतु प्रभावीपणे सौंदहरणासह मांडून जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून जी मान्यता दिली त्यामुळे धम्माचे महत्व अधिक प्रभावीपणे सर्वांसमोर आले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार व्यक्त करीत आपण आजवर जशी साथ दिली ती अशीच कायम राहिली तर अजूनही उत्तमोत्तम कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन धम्माचा प्रचार व प्रसार घरोघरी करता येईल” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.
सदर कार्यक्रमास आजी माजी विश्वस्त, आजी माजी मध्यवर्ती कमिटी, आजी माजी विभाग अधिकारी, गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील सर्व सभासद, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते व परिवार, बौद्धाचार्य व्याख्याते संदीप गमरे गुरुजी, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.