बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी २० दुर्मिळ विदेशी वन्य प्राणी जप्त करण्यात आले. या प्रकरणी सीमा शुल्क विभागाने दोघांविरोधात कस्टम्स कायदा १९६२ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
झहीरअब्बास अयनाल मंडल आणि भावेश रमेशभाई सोलंकी अशी अटक करण्यात आलेल्या प्रवाशांची नावे असून, हे दोघे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटने पुण्यात दाखल झाले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करताना, त्यांच्या बॅगेजमधून १४ ग्रीन ट्री अजगर (Morelia viridis) – त्यापैकी १३ जिवंत व एक मृत, ४ डबल-आयड फिग पोपट (Cyclopsitta diophthalma) आणि २ सुमात्रन पट्टेदार ससे (Nesolagus netscheri) सापडले.
सीमा शुल्क विभागाने या दुर्मिळ प्राण्यांची तस्करी केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्राण्यांचे मूळ स्त्रोत आणि भारतातील संभाव्य तस्करी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (RESQ) या NGO च्या संस्थापिका नेहा पांचमिया यांनी सांगितले की, “आमचा वैद्यकीय पथक विमानतळावर तात्काळ दाखल झाले आणि अत्यंत खराब परिस्थितीत आढळून आलेल्या प्राण्यांना प्राथमिक उपचार दिले.”
प्राणी सध्या नियंत्रित तापमान व देखरेखीखाली विमानतळावर ठेवण्यात आले असून, प्रवासामुळे होणारा ताण टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. CITES (Convention on International Trade in Endangered Species) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, न्यायालयीन आदेश व परवानगी प्राप्त झाल्यानंतर २४ ते ३६ तासांच्या आत या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
RESQ च्या पशुवैद्यकीय तज्ञांकडून पुन्हा तपासणी करून, प्राण्यांच्या तब्येतीमध्ये स्थिरता येईपर्यंत उपचार सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पांचमिया यांनी दिली.
या धक्कादायक घटनेमुळे पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, वन्यजीव तस्करीविरोधात कारवाईला गती मिळण्याची शक्यता आहे.