संतोष देशमुख हत्या प्रकरण; काही सीलबंद पुरावेही सादर मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात सादर

0
1

मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायालयात गुरुवारी (ता. दहा) झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर या प्रकरणातील मारहाणीचा व्हिडिओ सादर केला. पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे चार महिन्यांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या प्रकरणी आज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. निकम म्हणाले, ”संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केलेला आहे, तो न्यायालयात सादर करण्यात आला.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये, अशी विनंती करण्यात आली. आरोपी वाल्मीक कराड याच्यामार्फत सुटकेचा (डिस्चार्ज) अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्याच्या चल व अचल संपत्तीवर तपास सुरू आहे. आरोपी विष्णू चाटे सध्या लातूर कारागृहात असून, त्याला बीडमध्ये हलविण्याची मागणी त्याचे वकील ॲड. राहुल मुंडे यांनी केली. या खटल्याची पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार असून, त्याआधी फॉरेन्सिक पुरावे तपासून आरोपीच्या वकिलांना देण्यात येतील.”

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

काही सीलबंद पुरावे सादर

सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेले काही सीलबंद पुरावे न्यायालयात उघडण्यात येणार आहेत. या पुराव्यांमध्ये आरोपींचे जबाब, पंचनामे, शस्त्रे आणि जप्त साहित्याचा समावेश आहे. सीलबंद पुरावे न्यायालयासमोर उघडल्यानंतर ते आरोपींच्या वकिलांना दिले जाणार आहेत.

संपत्तीबाबत कराडकडून खुलासा नाही

आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी, असा अर्ज सरकारी पक्षाकडून न्यायालयात देण्यात आला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. यावर रीतसर सुनावणी होईल. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. पुढील तपास पूर्ण झाल्यावर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अॅड. निकम यांनी सांगितले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य