आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात केली जाणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने गेल्या सहा महिन्यापासून जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने प्रचार यंत्रणा राबविण्यात मोठी आघाडी घेतली आहे. येत्या काळात मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ अॅक्टिव्ह केले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपला या अभियानाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.






देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसापासून युद्धपातळीवर रणनीती आखली जात आहे. भाजपने (BJP) येत्या काळात ‘घर घर चलो अभियानाच्या’ माध्यमातून मुंबई शहर पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. या ‘घर घर चलो अभियाना’तंर्गत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले काम सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोचविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई शहरातील जवळपास 227 प्रभागात कार्यकर्ते व यंत्रणा कामाला लागली आहे.
पीएम नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांनी देशभरात केलेलं काम त्यासोबतच राज्य सरकारकडून करण्यात आलेली विकास कामे सर्वसामान्य नागिरकापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील नेतेमंडळींच्या विभागावर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीला डॉक्टर, वकील, सीए, माजी सैनिक, साहित्यिक मंडळी वैविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना मार्गदर्शन करीत आहेत.
भाजपने सुरु केलेल्या ‘घर घर चलो अभियान’च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यासाठी विभागस्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंत्रणाचा डिजिटल प्रचारावर भर
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने डिजिटल प्रचारावर भर दिला आहे. भाजपने मंडळ स्तरावर प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यावर सध्या भर दिला जात असून प्रभावी प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच सरकारने केलेले काम नागिरकापर्यंत पोंहचविण्यात कोणते मंडळ किती प्रभावी ठरते. यासाठी स्पर्धा होणार असून प्रचारासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे.
त्यासोबतच ‘एक पेड माँ के नाम’ ही एक अभिनव योजना ५ जूनपासून राबवली जात आहे. या माध्यमातून वृक्षारोपणाची योजना राबवली जात असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या निमित्ताने करीत पावसाळयाच्या दिवसाची संधी साधली आहे.
मायक्रो प्लॅनिंगमध्ये भाजपची आघाडी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने गेल्या काही दिवसापासून बूथनिहाय व प्रभागनिहाय बांधणी सुरु केली आहे. यामध्ये भाजपने ‘मिशन मुंबई’ अॅक्टिव्हपणे राबवत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना व महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अथवा काँग्रेसने मायक्रो प्लॅनिंग केलेले दिसत नाही. त्यामुळे निवडणूक घोषणेपूर्वीच भाजपने यामध्ये इतर पक्षांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे.











