पुणे मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रांचा राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोच्च गौरव

0

पुणे महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ले. पृथक बाराटे रुग्णालय, वारजे या केंद्राने ‘कायाकल्प’ राज्यस्तरीय पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती गुरुवारी अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.

या पुरस्काराचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणे आहे. या विजयाबद्दल वारजे येथील आरोग्य केंद्राला ₹२ लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

ले. बाबुराव शेवाळे रुग्णालय हे PMC चे आणखी एक नागरी आरोग्य केंद्र यामध्ये प्रथम उपविजेते ठरले असून, त्यांना ₹१.५ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. यासोबतच महापालिकेच्या आणखी १५ नागरी आरोग्य केंद्रांना कायाकल्प उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रत्येकी ₹५०,००० ची प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या पुरस्कार मूल्यांकन प्रक्रियेत PMC द्वारा चालवली जाणारी एकूण ११ नागरी आरोग्य सुविधा केंद्रे (UCHCs) देखील गौरवण्यात आली असून, प्रत्येक केंद्राला ₹१ लाख असे एकूण ₹११ लाखांचे बक्षीस देण्यात आले.

“ही मान्यता म्हणजे पुणे महापालिकेच्या स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम आरोग्यसेवा पुरवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे,” असे PMC च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.