दोन मराठी लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

0

यंदाच्या वर्षी दोन मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरेश सावंत यांना त्यांच्या “आभाळमाया” या बालकविता संग्रहासाठी बालसाहित्य पुरस्कार, तर प्रदीप कोकरे यांना त्यांच्या “खोल खोल दुष्काळी डोळे” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीतर्फे बुधवारी २४ भाषांमधील बालसाहित्य पुरस्कार आणि २३ भाषांमधील युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “प्रदीप कोकरे हे वास्तववादी लेखन करणारे लेखक आहेत. त्यांचे साहित्य गरीब, बेरोजगार, उपेक्षित आणि वंचित घटकांचे जीवन प्रतिबिंबित करते. सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य करणारे त्यांचे लेखन हे केवळ त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यक्षेत्रासाठी गौरवाची बाब आहे.”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सुरेश सावंत हे मराठी बालसाहित्याचे ज्येष्ठ लेखक आणि कवी असून त्यांची भाषा साधी, मनमोकळी आणि मुलांना सहज समजणारी आहे. “आभाळमाया” या संग्रहात निसर्ग, आकाश, स्वप्नं आणि बालपणाच्या भावविश्वावर आधारित कविता आहेत.

प्रदीप कोकरे यांनी आपल्या कादंबरीबद्दल सांगितले की, “माझी कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या अस्मितासंकटांवर आधारित आहे. कथानायक एका लहानशा गावातून शिक्षणासाठी मुंबईत येतो आणि त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यातून त्याच्या अस्तित्वासंदर्भातील प्रश्न उभे राहतात. संपूर्ण कादंबरीत त्याच्या भावना कवितेच्या रूपात व्यक्त होतात. ही कादंबरी यशवंतराव चव्हाण केंद्र फेलोशिप २०२२ अंतर्गत पूर्ण केली. साहित्यातील संमेलने होतात, पण प्रत्यक्ष तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा