गुरुवारच्या पहाटेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे शहरात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते ओसंडून वाहू लागले, परिणामी वाहतूक ठप्प झाली. झाडे पडण्याच्या घटना घडल्या. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) १९ जून रोजी मध्यरात्रीपासून दुपारी ५.३० वाजेपर्यंत पुण्यात ५४.२ मिमी पावसाची नोंद झाली.
हिंजवडी, मुंढवा, कोथरूड, हिंगणे आणि धायरी-सिंहगड रोड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही भागांत घरात पाणी घुसले. साईनगर (हिंगणे) येथे वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे घरात पाणी शिरले, असा आरोप नागरिकांनी केला.
साईनगरचे रहिवासी गोविंद गोरे म्हणाले, “मागील वर्षी आमच्या घरामागील भिंत कोसळली होती. अनेक वेळा तक्रार करूनही दुरुस्ती झाली नाही. गुरुवारी सकाळी ८ वाजता पावसाचा जोर वाढल्यामुळे घरात पाणी घुसले. रात्री पाऊस वाढल्यास येथे राहणे अत्यंत धोकादायक ठरेल.”
शिवशंभो नगरमधील व्हीआयआयटी कॉलेजच्या मागील गल्ली क्रमांक ३ येथे सिटी टॉवर इमारतीजवळ मोठा खड्डा पडल्याने जमिनी खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाषाणच्या पंचवटी परिसरात निशिगंध इमारतीसमोर झाड कोसळून २२ वर्षीय C-DAC विद्यार्थिनी काजल जखमी झाली. एक चारचाकी आणि दुचाकीचे नुकसान झाले. फायर ब्रिगेडने तत्परतेने काजलची सुटका करून औंध येथील साई श्री रुग्णालयात दाखल केले.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता १९२० क्यूसेक्सने सुरू असलेला विसर्ग रात्री ११ वाजता १५,०९२ क्यूसेक्स इतका करण्यात आला.
खडकवासला धरणात मागील २४ तासांत ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून १.६६ टीएमसी (साधारणतः ८४%) पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
- पानशेत: ११६ मिमी पाऊस, २.४६ टीएमसी (२३.१३%)
- वरसगाव: ११३ मिमी पाऊस, ४.१६ टीएमसी (३२.४५%)
- टेमघर: ९० मिमी पाऊस, ०.४० टीएमसी (१०.८४%)
- एकूण साठा: ८.६८ टीएमसी (२९.७८%)
(मागील वर्षी याच दिवशी ३.६२ टीएमसी म्हणजे १२.४३% साठा होता)
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः मुठा नदीकाठी राहणाऱ्यांना. पाण्याचा प्रवाह अधिक वाढू शकतो, आणि हवामान पाहून आणखी विसर्ग होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
IMD च्या आकडेवारीनुसार, पुण्यात यंदा जून महिन्यात आत्तापर्यंत २३२ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्य सरासरी १६६.३ मिमी पेक्षा अधिक आहे. सलग दुसऱ्या वर्षी जून महिन्यात २०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. (२०२४ मध्ये: २५२ मिमी)
१९ जून रोजी (१२ ए.एम. ते ५.३० पी.एम.) क्षेत्रनिहाय पावसाचे मिमीमध्ये वितरण:
- शिवाजीनगर: 54.2
- पाषाण: 64.2
- लोहगाव: 52.8
- चिंचवड: 90.0
- लावळे: 96.0
- मगरपट्टा: 49.0
- कोरेगाव पार्क: 0.5
- एनडीए : 86.0