अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.या विमान अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात सरकारी यंत्रणांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भीषण विमान अपघातात एक प्रवासी बचावला असल्याची माहिती आहे. विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. या प्रवाशाचं नाव विश्वशकुमार रमेश असं आहे. त्याचा रुग्णवाहिकेकडे जात असतानाचा व्हिडिओ समोर आल आहे.






विमानातील एक प्रवासी बचावला
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या संदर्भातील माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात 11 अ या सीटवरील प्रवासी बचावल्याची माहिती आहे. या बचावलेल्या प्रवासाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या विमान अपघातात किती जणांचा मृत्यू झाला हे सध्या सांगता येणार नाही, असं ते म्हणाले. विमान निवासी भागात क्रॅश झाल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असंही जीएस मलिक यांनी म्हटलं.
अपघात कसा घडला?
विश्वश कुमार रमेश हे 40 वर्षांचे असून ते या विमान अपघातातून बचावले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर 30 सेकंदात मोठा आवाज सुरु झाला अन् विमान क्रॅश झालं, हे खूप वेगानं घडलं, असं विश्वश कुमार रमेश म्हणाले. ते या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्या छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे, ते हिंदूस्तान टाइम्स सोबत बोलत होते. अहमदाबादमधील मेघानीनगर या भागात एअर इंडियाचं विमान कोसळलं. हे विमान बोईंग कंपनीकडून तयार करण्यात आलं होतं. एअर इंडियाच्या एआय -171 या फ्लाईटनं लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं आणि काही सेकंदांमध्येच ते मेघानीनगरमध्ये कोसळलं. एअर इंडियाचं हे विमान सिव्हील रुग्णालयाच्या टीबी विभागावर तर बीजे मेडिकल कॉलेजच्या कोसळलं. या अपघातात होस्टेलमध्ये विद्यार्थी जेवण करत होते, ते देखील जखमी झाल्याची माहिती आहे.
एअर इंडियाच्या या विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल हे मुंबईचे रहिवासी आहेत. तर को पायलट क्लाइव्ह कुंदर हे होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तास विमान उडवण्याचा अनुभव होता.













