सारसबागेतील सिद्धिविनायक मंदीर परिसरात मुस्लीम समाजाने मांसाहारचे सेवन केले, असा दावा भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसंच या प्रकारानंतर “कोणी हेतुपुरस्सर अशा गोष्टी करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार असेल, तर हिंदू समाज सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.” असे म्हणत कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, कुलकर्णी यांच्या संतापानंतर पुणे महापालिकेकडून सारसबागेत खाद्य पदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत बोलताना खासदार कुलकर्णी म्हणाल्या, सारसबागेचा परिसर हा देवस्थान ट्र्स्टचा परिसर आहे. ती जागा महापालिकेने भाडेतत्वावर घेऊन बाग केली आहे. तिथे तळ्यातील गणपती परिसरात मांसाहार करणं हा आमच्या धर्माचा अपमान आहे. म्हणजे तुम्ही इतर बागांमध्ये असे काही करणार नाही, पण हेतुपुरस्पर तुम्ही इथे याल आणि मांसाहर कराल? आमचे सिद्धिविनायकाचे मंदीर तिथे आहे. तळ्यातील गणपती आहे. हा संपूर्ण परिसर पेशवेकालिन आहे. त्यामुळे इथे असे काही घडू देणार नाही.
याचसाठी आम्ही पत्र दिले होते, त्यानंतर महापालिकेने इथले पावित्र्य राखण्यासाठी जी भूमिका घेतली त्यासाठी अभिनंदन करेल. आम्हाला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे चांगले लोकं आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहेच. परंतु जे मुद्दाम इतर धर्मीयांवर टार्गेट करण्याचा कार्यक्रम करत असतील तर हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि ते सडतोड उत्तर देण्यास सक्षम आहेत, असाही इशारा खासदार कुलकर्णी यांनी दिला.