महाराष्ट्रातील सध्याची राजकीय गणिते लक्षात घेता गेली ३ दशके सुरू असलेली युती आणि आघाडीची गणिते अविभाज्य भाग बनली असताना ध्येय गाठण्यासाठी सत्ता आवश्यक असल्याचा सल्ला देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सदस्य नोंदणी व आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती काळजी घ्यायची याबाबत सल्ला देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देखील दिल्या. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे. हा विकास रथ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवायचा असून या राज्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी भाषणात अजित पवारांनी विविध मुद्य्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच, त्यांच्यावर निधी देत नसल्याच्या सततच्या होणाऱ्या आरोपालाही स्पष्टपणे उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, ”कधीकधी काही काहीजण अशा बातम्या सोडतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय? शेवटी राज्य सरकराने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही २० ट्कके सोडतो, दुसऱ्या तिमाहीत ४० ट्कके सोडतो, तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के सोडतो. नंतर ८० टक्के आणि शेवटच्या महिन्यात १०० टक्के. अशा पद्धीतचे ते नियोजन असतं.”
तसेच ”मागील मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचेवळी लक्षात आलं की, अशाच पद्धतीने अनुसूचित जातीला देखील दिलं पाहीजे. कारण, आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढील कॅबिनेटमध्ये हा विषया आला पाहीजे.”
याचबरोबर, ”आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचंही काम केलं आहे. अनेक कार्यकर्ते, सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे.” असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.
याशिवाय, ”आज आपल्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यात होत असला, तरी राज्याच्या आणि देशाच्या इतरही भागात जिथं जिथं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ते देखील आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे.” अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली.
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने सत्तेसाठी त्यांनी भाजपसोबत तडजोड केले असल्याचा आरोप केला जातो. आज पुण्यामध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्येय गाठण्यासाठी सत्ता आवश्यकच असल्याचा सल्ला पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना देखील दिल्या.