भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न सध्या स्थगित करण्यात आले आहे. अभियंत्यांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमधील गळती दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मागितल्यामुळे शुभांशू आणि इतर ३ जणांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) घेऊन जाणारे अॅक्सिओम-४ मिशन सध्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
स्पेसएक्सने घोषणा केली की ते पोस्ट-स्टॅटिक बूस्टर तपासणी दरम्यान आढळलेल्या द्रव ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती करण्यासाठी अॅक्सिओम-४ मोहिमेच्या फाल्कन-९ लाँचला “मागे हटवत” आहे. स्पेसएक्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पोस्ट-स्टॅटिक फायर बूस्टर तपासणी दरम्यान आढळलेल्या LOX गळतीची दुरुस्ती करण्यासाठी टिमला अतिरिक्त वेळ देण्यासाठी स्पेसएक्स बुधवारी अॅक्स-४ च्या फाल्कन ९ लाँचपासून माघार घेत आहे.” स्पेसएक्सने असेही म्हटले आहे की, “हे पूर्ण झाल्यानंतर आणि रेंजची उपलब्धता मिळाल्यानंतर, आम्ही नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करू.”
शुभांशू शुक्ला सुमारे ४१ वर्षांनी भारतीय म्हणून अंतराळात जाणार होते. आता आपल्याला यासाठी आणखी वाट पाहावी लागेल. यापूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसमॉस कार्यक्रमाद्वारे ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.
लखनऊमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला हे भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) आणि नासा समर्थित अॅक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळयानाचा भाग आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी संध्याकाळी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून १४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या प्रवासासाठी निघणार होते.
https://x.com/SpaceX/status/1932599956336173058?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1932599956336173058%7Ctwgr%5E1f58f15cd676eb573ec14e7178f6afb9292a4a9c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Findia%2Faxiom-04-mission-postponed-launch-sending-first-indian-gaganyatri-shubhanshu-shukla-iss-spacex-falcon-9-3335960.html
१० ऑक्टोबर १९८५ रोजी जन्मलेले शुभांशू राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये सामील होण्यापूर्वी सिटी मोंटेसरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यांना २००६ मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांना सुखोई-३० एमकेआय, मिग-२९, जग्वार आणि डोर्नियर-२२८ यासह विविध प्रकारच्या विमानांवर २ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IIS), बंगळुरू येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक पदवी देखील मिळवली आहे.
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९ मध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीर संघात इतर अधिकाऱ्यांसह निवड झाली होती. हे गगनयान २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाकडे परतण्याचे प्रतीक मानला जात आहे, कारण ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.