आपल्या संपूर्ण भारतात केंद्र शासनाच्या वतीने कॅशलेस व्यवहार करण्यासंबंधी वारंवार सूचना करण्यात येतात. आपल्या पुणे शहराला स्मार्ट पुणे शहर अशी ओळख यापूर्वीच मिळालेली आहे. या पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचे दवाखाने विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या दवाखान्यामध्ये सर्वच घटकातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. येणाऱ्या रुग्णांकडून ओपीडी करिताची फी फक्त कॅश स्वरूपातच आकारली जाते. बऱ्याचदा रुग्ण ऑनलाइन माध्यमातून ओपीडीचे पैसे घेण्याची विनंती करतात परंतु संबंधित दवाखान्यामध्ये फक्त आणि फक्त कॅश/रोख स्वरूपातच पैसे घेतले जातात. सरकार एका बाजूला कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असताना दुसऱ्या बाजूला शासनाच्याच दवाखान्यांमध्ये या धोरणाला हरताळ फासल्याचे दिसून येते. अजूनही आपण रोखीनेच व्यवहार करत आहोत.
आपल्या स्मार्ट पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये अजूनही केवळ रोखीने पैसे आकारणे ही बाब खूप निंदनीय आहे किंबहुना या कृतीमुळे अनेक रुग्णांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पुणे शहराबरोबर आपण देखील कधी स्मार्ट बनणार आहोत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आणि म्हणूनच आज मनसे नेते राजेंद्र वागसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरुड उपविभाग अध्यक्ष सचिन विप्र यांनी पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांना नागरिकांची होणारी गैरसोयी टाळण्यासाठी पुणे मनपाच्या सर्व दवाखान्यांमध्ये कॅशलेस (ऑनलाईन) व्यवहार सुरू करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र सैनिक सागर अत्रे, किरण जोशी उपस्थित होते.