मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोबतच्या युतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे, त्यामुळे आता राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरती आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच असं अंधारे म्हणाल्या आहेत.






राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे भाऊ भाऊ
महाराष्ट्राच्या हितापुढे कोणाच्याही महत्वकांक्षा इतक्या नाहीत हे राज ठाकरेंनी केलेले विधान मला तंतोतंत पटलेलं आहे. किंबहुना राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे भाऊ भाऊ आहेत कुटुंब म्हणून दोघांनीही एकत्र राहिला पाहिजे, पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणारे पैकी मी आहे. मात्र या दोघांचा राजकारण एकत्रित राहिला पाहिजे का याबाबत चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच, मात्र ते एकत्रित येणे हे ज्या भाजपाने महाराष्ट्रात अस्मिता काय पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, महापुरुषांचा अपमान केला, उद्योगधंदे पळवले, त्या भाजपाच्या विरोधात बिगुलवाजवीत, विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र राजकारण करण्यासाठी राज ठाकरे सिद्ध होणार आहेत का? त्यांना प्रश्न विचारायला हवं होतं स्वतंत्र अस्मितेच्यासाठी एकत्रित येणार की भाजपचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी एकत्र येणार हे विचारायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.
उध्दव ठाकरे काय म्हणाले?
किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.











