विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, जामीनही मागण्याची शक्यता खंडणीचा तपास पूर्ण; SIT कडून होऊ शकते अटक

0

संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आताची सर्वात मोठी बातमी हाती आलेली असून खून आणि खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या विष्णू चाटेला केज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणीच्या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली.

विष्णू चाटे याच्यावर खुनाचाही गुन्हा दाखल झाला आहे. खुनाचा तपास एसआयटीकडून केला जातोय तर सीआयडीकडून खंडणीचा तपास सुरु आहे. यामध्ये खंडणी प्रकरणाचा तपास संपला असं सीआयडीने कोर्टात म्हटलं आहे.

विष्णू चाटेला केज कोर्टात हजर केल्यानंतर केवळ सात मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र चाटेवर खुनाचादेखील गुन्हा दाखल आहे. त्यामुळे एसआयटीला त्याचा ताबा मिळू शकतो.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

हत्या प्रकरणी विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून कोर्टात अर्ज करण्यात येणार आहे. न्यायालयाने परवानगी दिली तर हत्येच्या गुन्ह्यात विष्णूला अटक होईल. त्यानंतर एसआयटीकडून खून प्रकरणात त्याची चौकशी होईल. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे चौकशीसाठी सहकार्य करीत नाही, असं मागच्या सुनावणीवेळी पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं.

दरम्यान, मागच्या सुनावणीपर्यंत विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना मिळालेला नव्हता आणि त्यानेही त्याबाबत कोणतीही माहिती तपास यंत्रणेला दिलेली नव्हती. चाटेने त्याच्या मोबाईलचं काय केलं? हे अद्याप समजलेलं नाही. शेवटी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील फिर्यादी शिंदे यांच्या मोबाईलमधून कॉल रेकॉर्डिंग मिळवलेले आहेत. त्यामुळेच आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दुसरीकडे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी पोलिसांना सापडत नाहीये. त्यामुळे तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच निष्पक्ष तपास व्हावा आणि वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावं, या मागणीसाठी राज्यभर सर्वपक्षीय मोर्चे सुरु आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देशमुख कुटुंबियांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कुणालाही सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात कुणाचंही नाव आलं आणि कुणी कितीही मोठा असला तरी यात वाचणार नाही, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे.