बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. अपहरणानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पण ज्यावेळी देशमुख यांचं अपहण झालं, त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला होता. संतोष देशमुख यांची अपहरकर्त्यांच्या तावडीतून तत्काळ सुटका करावी, यासाठी खासदार सोनवणे शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र एसपी बारगळ यांनी सोनवणे यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही.
याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे बारगळ यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता या प्रस्तावावर मोठा निर्णय झाला असून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या हक्कभंग आणि नैतिकता विभागाचे उपसचिव यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना १८ डिसेंबरला पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तपासात कुचराई केल्याप्रकरणी एसबी बारगळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या प्रकरणात बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ दोषी आढळले, तर त्यांना तुरुंगवास होऊ शकतो. खासदाराच्या विशेष अधिकाराचा भंग किंवा सदनाचा अवमान केल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास, ताकीद देणे किंवा फटकारणे अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते. याशिवाय हक्कभंग केल्यामुळे निलंबन किंवा हकालपट्टी अशा प्रकारची शिक्षाही होऊ शकते. राज्यात तापत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कारवाईबाबत असलेला राजकीय दबाव पाहता, तत्कालीन एसपी बारगळ यांना तुरुंगवास होऊ शकतो, असं बोललं जातंय.
त्यादिवशी नेमकं काय घडलं?
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. यानंतर अवघ्या काही वेळात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना या घटनेची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी देशमुख यांना वाचवण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले. बारगळ यांना अनेक मेसेज आणि फोन करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बारगळ यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. या प्रकारानंतर खासदार सोनवणे यांनी १२ डिसेंबरला लोकसभेत बारगळ यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. आता हक्कभंग आणि नैतिकता विभागाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.