नवीन वर्ष आणि ख्रिसमस सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. गृहविभागाच्या या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयामुळे बंदोबस्तासाठी तैनात राहणाऱ्या पोलिसांची मोठी दमछाक होणार आहे.
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी राज्यातील पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाचपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बीअर/ वाइन विकणाऱ्या दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय FL BR-II परवानाधारकांसाठीही अशीच मुदतवाढ देण्यात आली. तसेच ऑऊटडोअर कॉन्सर्टसाठी रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
गृहविभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे परमीट रूम सुद्धा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवसांसाठी देण्यात आली आहे. इतर दिवशी रात्री साडेदहा वाजेपर्यंत दुकाने बंद करावी लागणार आहेत.
राज्य सरकारने ही परवानगी दिली असली, तरी या निर्णयामुळे पोलिसांची मोठी दमछाक होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुक्ल विभागाची पथके तैनात करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने ही परवानगी दिली असती, तरी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघता, जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.