अंबानी भाजपचे उद्योगपती असल्याचा सातत्याने राहूल गांधी आणि इंडिया आघाडीच्यावतीने आरोप केले जात असताना सोमवारी अंबानी यांचे जावई तसेच प्रसिद्ध उद्योगपती आनंद पिरामल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. हे बघता येत्या काळात आता विरोधकांच्या हातात आरोपांसाठी आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपकडून आरोप-प्रत्यारोपांची धार आणखीच वाढणार आहे. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाला नागपूरमध्ये 17 मेपासून प्रारंभ झाला होता, देशभरातील 936 कार्यकर्ते या वर्गात सहभागी झाले होते. वर्गाचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रामुख्याने उपस्थित होते.
समारोपाला श्री क्षेत्र गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांच्यासह वैज्ञानिक डॉ. कृष्णा इला, उद्योजक प्रणुल जीद्दाल, नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, नाम फाऊंडेशनचे मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश थोरात आदींनी हजेरी लावली. मात्र, आनंद पिरामल यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संघ शिक्षा वर्गासह नागपूरमध्ये संधाचे वेगवेगळे कार्यक्रम नियमितपणे होत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला ख्यातनाम व्यक्तीला बोलावण्यात येते. संघाचा आणि भाजपचा काही संबंध नाही, असे दावे दोन्ही बाजूने सातत्याने केले जातात. संघ हा फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो असेही सांगण्यात येते.
अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजप आता सक्षम झाली असल्याने आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी संघाच्या मदतीची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप आणि स्वयंसेवकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
महाराष्ट्रात भाजपचे मोठ्या प्रमाणात उमेदवार पराभूत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेतून मोकळे करण्याची विनंती केली होती. नागपूरला आले असता त्यांच्या निवासस्थानी संघाचे तीन पदाधिकारी त्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीला स्वाना झाले होते.
आरोप-प्रत्यारोपांची धार वाढणार
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मोदी आणि अंबानींना मोठमोठे कंत्राट दिल्याचा आरोप विरोधकांच्यावतीने सातत्याने केला जात आहे. लोकसभेच्यावेळी भाजपच्यावतीने पलटवार करून अंबानी आणि अदानी यांच्याकडूनच काँग्रेसने पैसा घेतल्याचा आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अंबानी यांच्या जावयांनी संघाच्या कार्यक्रमास हजेरी लावल्याने आरोप-प्रत्यारोपांची धार आणखीच वाढणार आहे.