नीट (NEET) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी NTAला नोटीस जारी केली आहे. परीक्षेची पवित्रता प्रभावित झाली आहे. त्यामुळे याबाबत NTAने उत्तर दिलं पाहिजे. एनटीएला उत्तर द्यावं लागेल, असं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कौन्सिलिंगला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी आता 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाने NTA ला नोटीस दिली असून या प्रकरणातील यापूर्वीच्या याचिकाही या सोबतच विचारात घेतल्या आहेत.
नीट परीक्षा (NEET 2024) च्या निकालात गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेत 1 हजार 563 परीक्षार्थींना ग्रेस मार्क्स देण्याच्या प्रकारालाही आव्हान देण्यात आलं होतं. तसेच ही परीक्षाच रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आळी होती. नीटच्या परीक्षेत एकूण 67 विद्यार्थ्यांनी टॉप केलं आहे. या परीक्षात गडबड झाल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात जोरदार आंदोलन केलं होतं. ही परीक्षा रद्द करण्याची आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती.
OMR शीट फाडली
NEET UG 2024चा निकाल 4 जून रोजी लागला होता. अनेक विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन दिसत नव्हता. काही विद्यार्थ्यांना अत्यंत कमी मार्क मिळाले होते. OMR शीटच्या नुसार जेवढे मार्क्स मिळायला हवेत तेवढे मिळाले नव्हते. या परीक्षेत 67 विद्यार्थी टॉपला आले होते. OMR शीट फाडल्या गेल्याचा आरोपही केला जात आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्यावर लखनऊमधील आयुषी पटेलने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 4 जून रोजी माझा निकाल दिसत नव्हता. त्यानंतर मी NTA ला मेल केला. त्यावेळी OMR शीट फाडल्या गेल्याचं सांगितलं गेलं. पण या शीटचा फोटो स्पष्टपणे दिसत होता. ही OMR शीट जाणूनबुजून फाडल्या गेल्याचं दिसत होतं, असं आयुषी म्हणाली.
NTAची प्रतिक्रिया काय?
दुसरीकडे एनटीएने परीक्षेत कोणत्याही प्रकारची गडबड झाली नसल्याचं म्हटलं आहे. काही परीक्षा केंद्रावरील लॉस ऑफ टाइममुळे काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले, असंही एनटीएने स्पष्ट केलं आहे. शिक्षण मंत्रालयाने 1500 हून अधिक परीक्षार्थींना ग्रेस मार्क्स देण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केल्याची माहितीही एनटीएने शनिवारीच दिली होती.
राजकारण तापले
दरम्यान, नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावरून आता राजकारण तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकसाथ 67 विद्यार्थी परीक्षेत टॉप आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. आता एक दोन नव्हे तर 67 विद्यार्थी टॉपला आले आहेत. असं कसं होऊ शकतं? असा सवाल या नेत्यांनी केला आहे. तर परीक्षेतील धांदलीमुळे 24 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. हा मुद्दा आम्ही संसदेत उचलणार आहोत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. तर परीक्षेतील अशा प्रकारच्या धांदलीचे प्रकार गंभीरपणे घेतले पाहिजे. त्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे, असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.