तुम्ही इंटरनेटवर अशा दुकानांचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये एकही कर्मचारी नाही. विशेषतः जपान आणि अमेरिकेत असे कित्येक स्टोअर्स आहेत, जिथे लोक स्वतःच वस्तू घेऊन, त्या स्कॅन करुन बिल देऊन बाहेर पडतात. अशाच प्रकारचं फ्युचरिस्टिक स्टोअर पुण्यातील तीन तरुणांनी तयार केलं आहे. Jiffi असं नाव असणारं हे स्टोअर 1 मे पाहून सुरू होणार आहे.
पुण्यातील पिंपळे निलख येथील वॉटर स्क्वेअर कमर्शिअल कॉम्पलेक्समध्ये हे स्टोअर उभारण्यात आलं आहे. या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे, याठिकाणी एकही कर्मचारी किंवा कॅशिअर देखील नसणार आहे. तसंच हे स्टोअर 24×7 सुरू राहणार आहे. हे संपूर्ण स्टोअर ऑपरेट करण्यासाठी एआय आणि इतर टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात आली आहे.
चिन्मय राऊत, इमॅन्युएल डिसूझा आणि अमेय रिठे या तिघांनी मिळून हे शॉप उभारलं आहे. या तिघांनी स्वतःच डेव्हलप केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये पुण्यात अशी पाच दुकानं उभारण्याची या तिघांची योजना आहे. तसंच भविष्यात पॅन इंडिया आणि आशियामध्ये देखील ही चेन वाढवण्याचा त्यांचा विचार आहे.
चिन्मय राऊत हा कम्प्युटर इंजिनिअर आहे, आणि या कंपनीचा सीईओ देखील आहे. इमॅन्युएल डिसूझा हा इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर आहे, आणि या कंपनीचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे. तर अमेय रिठे हा कम्प्युटर इंजिनिअर आहे, आणि या कंपनीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे. 2014 सालापासून ते या प्रोजेक्टवर काम करत आहेत. ग्राहकांना पारंपारिक शॉपिंगपेक्षा वेगळा अनुभव देण्यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचं ते सांगतात.
या तिघांनी मिळून Natzu Technologies म्हणून एक कंपनी उभारली आहे. या अंतर्गत Jiffi हे ब्रँड नेम लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांनी BillerX नावाचं एक अॅपही तयार केलं होतं. प्रसिद्ध रिटेल स्टोअर्समध्ये सेल्फ-चेकआउट सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आलं होतं. मात्र, पुढे आणखी रिसर्च आणि तयारी करुन त्यांनी आता थेट ‘अनमॅन्ड शॉप’च लाँच केलं आहे. यासाठी त्यांना 100Watts या कंपनीचं मार्गदर्शन देखील लाभलं.
कसं करतं काम?
या दुकानातून खरेदी करणं अगदी सोपं असणार आहे. दुकानात प्रवेश करण्यासाठी ग्राहकांना Jiffi चं Progressive Web App डाऊनलोड करावं लागेल. या अॅपमधील QR कोड स्कॅन करुन तुम्ही दुकानात प्रवेश करू शकाल. यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या शॉपिंग कार्ट घेऊन तुम्ही सामान घेऊ शकता.
प्रॉडक्ट्स ज्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत, त्यांनाही सेन्सर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही एखादे प्रॉडक्ट उचलल्यास ते आपोआप तुमच्या कार्टला रजिस्टर होईल. तुम्ही ते प्रॉडक्ट माघारी ठेवल्यास ते लिस्टमधून काढलं जाईल. तुमची शॉपिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झिट गेटजवळ जाल, तेव्हा कम्प्युटर व्हिजनच्या मदतीने तुम्ही घेतलेले प्रॉडक्ट्स तपासले जातील, यानुसार तुमच्या अॅपवर बिल पाठवलं जाईल.
डिस्काउंट किंवा ऑफर्स या गोष्टी अॅपवर आपोआप लागू केल्या जातील. यानंतर यूपीआय, बँकिंग अॅप किंवा कार्ड पेमेंटच्या मदतीने ग्राहक बिल भरू शकतील. बिल भरल्यानंतर बाहेर जाण्यासाठी दरवाजे उघडले जातील.
ग्राहक पळून गेले तर?
जर दुकानात कोणी कॅशिअर किंवा कर्मचारी नसेल, तर तिथे चोरी होण्याची शक्यता नक्कीच असते. याचा विचार करून सुरक्षेचे उपायही करण्यात आले आहेत. एखाद्या ग्राहकाने बिल न देता किंवा चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर कंट्रोल हबला लगेच त्याचा मेसेज जाईल. हे कंट्रोल हब दुकानापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.