आपल्या उत्तम अभिनयामुळे केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचा ठसा उमटवणारे कलाकार म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांना आजवर अभिनयक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी वेगेवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि काल म्हणजे 24 एप्रिलला त्यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं. या सोहळ्याला बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, मंगेशकर कुटुंब, रणदीप हुडा, पद्मिनी कोल्हापुरे, रुपकुमार राठोड, अभिषेक बच्चन, चिन्मय मांडलेकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांनी भावनिक भाषण केलं.






काय म्हणाले अशोक सराफ?
ते म्हणाले, “नमस्कार, इतक्या आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही इकडे जमलात याबद्दल तुमचे आभार मानतो. स्टेजवरचे म्हणजे आपण वर्णन करू शकत नाहीत असे कलावंत बसले आहेत त्यांच्या रांगेत मी बसलोय यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही मोठी गोष्ट आहे. अनेक अवॉर्ड्स मिळाले आतापर्यंत इतके मी मला मोजता येत नाहीत आणि आठवतही नाहीत. पण आजचा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आनंदाची म्हणजे परिसीमा झालीये असं मला वाटतं. मी एक कलाकार आहे आणि एका असामान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळतोय आणि आज इथे एक मोठा असामान्य नटाच्या उपस्थितीत मिळतोय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. हा सन्मान फक्त माझा नाहीये तर तुमच्या सगळ्यांचा सन्मान आहे. कलाकार हा फक्त काम करतो. तो वेगवेगळे प्रयोग करतो पण ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण, मी केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या यासाठी मी तुम्हा सगळ्यांचा ऋणी आहे. आज मी माननीय हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचे आभार मानतो की, त्यांनी मला या पुरस्काराच्या लायक समजलं. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या हृदयात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही”
अशोक सराफ यांचं हे भाषण सध्या सगळीकडे चर्चेत असून त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.











