रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 च्या हंगामात 6 सामन्यात फक्त 32 धावा केल्या. तसेच तीन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीनंतर तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्याने ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव त्याने आयपीएल स्पर्धेच्या मध्यभागी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
‘मी सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला कारण…’
ग्लेन मॅक्सवेलने सांगितले की, सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून आपण स्वत: संघासाठी योगदान देऊ शकत नसल्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सामने वैयक्तिकरित्या माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे होते. शेवटच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांशी बोललो. त्यानंतर अन्य खेळाडूला संधी द्यायची असे ठरले. मी याआधीही अशा परिस्थितीत होतो. सध्या मी स्वत:ला मानसिक आणि शारीरिक आराम देण्याचे काम करत आहे, असं मॅक्सवेलने स्पष्ट केले.
आरसबीचा हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव-
तब्बल 549 धावा कुटल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 25 धावांनी नमवले. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.