वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप अंतिम फेरीत पोहचलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आता दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे. पाकिस्तानकडे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि नववर्षाची अविस्मरणीय अशी सुरुवात केली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 615 धावांचा डोंगर उभारला. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची 3 बाज 72 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर ओपनर रायन रिकेल्टन आणि कर्णधार टेम्बा बावुमा या जोडीने मॅचविनिंग द्विशतकी भागीदारी केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 235 धावांची भागीदारी केली. टेम्बा बावुमाने या दरम्यान कसोटी कारकीर्दीतील चौथं शतकं झळकावलं. टेम्बा 179 बॉलममध्ये 106 रन्स करुन आऊट झाला. तर रिकेल्टन याने कारकीर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. रायनने पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं. रायननने 259 धावां केल्या. तर केशव महाराजने 40 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारने पहिल्या डावात 615 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या 615 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान पहिल्या डावाच 194 धावांवर ढेर झाली. बाबर आझम याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाज फ्लॉप झाले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने फॉलोऑन खेळताना अप्रतिम बॅटिंग केली. पाकिस्तानने कॅप्टन शान मसूद याच्या 145 आणि बाबर आझमच्या 81 धावांच्या मोबदल्यात 400 पार मजल मारली. पाकिस्तानने 478 धावा केल्या.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयसााठी दुसऱ्या डावात 58 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेच्या या सलामी जोडीनेच हे आव्हान पूर्ण केलं.
डेव्हिड बेडिंगहॅम आणि एडन मार्करम या सलामी जोडीने 7.1 हे आव्हान सहज पूर्ण केलं. डेव्हिड बेडिंगहॅम याने 30 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तर एडन मार्करम 13 चेंडूत नाबाद 1 धावांचं योगदान दिलं.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि क्वेना माफाका.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अब्बास