अजितदादांच्या निवासस्थानी आमदार एकवटले, खलबतं; शरद पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया

0

बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार नाराज असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार पोहोचलेले आहेत. सकाळपासूनच ही बैठक सुरू असून त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने राष्ट्रवादीत मोठं काही तरी घडत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील नाराजीनाट्यावर भाष्य केलं.

अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक कशासाठी घेतली हे मला नक्की माहीत नाही. पण विरोधी पक्षनेता म्हणून सदस्यांची बैठक बोलावण्याचा त्यांना अधिकार आहे. ते अशा बैठका बोलवत असतात. विषय काय आहे माहीत नाही. पण संध्याकाळपर्यंत मला त्याची माहिती मिळेल. या पेक्षा अधिक माहिती मला नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या बैठका होतच असतात. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. पण 6 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. ती नेत्यांची बैठक आहे. मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आधीच कार्यक्रम रद्द

तुम्ही नगरचा कार्यक्रम रद्द का केला? अजित पवार यांच्या नाराजीनाट्यामुळे कार्यक्रम रद्द केला का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नगरचा कार्यक्रम आधीच रद्द झालेला असल्याचं स्पष्ट केलं. गेल्याच आठवड्यात नगरचा कार्यक्रम रद्द झाला होता. आता सुप्रिया सुळेही मुंबईवरून पुण्याला यायला निघाल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

6 जुलै रोजी बैठक

अजितदादांनी संघटनेच्या जबाबदारीची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी मी एक बैठक बोलावली आहे. येत्या 6 जुलै रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. संघटनेत पुनर्रचना करण्याची गरज आहे काय? महिला, युवक आणि अल्पसंख्यांकांच्या संघटनेत काही बदल करायचे का? यावर चर्चा होईल. तसेच युथ राष्ट्रवादीत वयाचं बंधन आहे. तरीही काही लोक वय ओलांडल्यानंतरही काम करत असतात. त्यामुळे त्यावर निर्णय घेतला पाहिजे अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केल.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

म्हणून दिल्लीत गेले

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचे कार्यकर्ते अशोक पवार यांच्या घरातील लग्न दिल्लीत होतं. त्यामुळे मी, अजित पवार, जयंत पाटीलही दिल्लीत गेलो होतो. याच चार दिवसातील ही गोष्ट आहे, असा खुलासा त्यांनी केला.

एकटा निर्णय घेत नाही

आजच्या बैठकीत काय होईल ते मला कळवलं जाईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबतची चर्चा 6 तारखेच्या बैठकीत पूर्ण होईल. अजित पवार संघटनेत काम करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण असे निर्णय एक व्यक्ती ठरवत नाही. पक्षात सर्व बसून निर्णय ठरवत असतात. अध्यक्ष निवडण्याचा निर्णय मी एकटा घेत नाही. सर्वांना विचारून निर्णय घेत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार