मुंबईः अजित पवार यांच्यासह ९ जाणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्ष म्हणूनच आपण सत्तेत सहभागी झालेलो असून इथून पुढच्या सगळ्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असून ते उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी शु्क्रवारीच विधानसभा विरोधी पक्षनेते पादाचा राजीनामा दिलेला होता. मागील अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा असतांना माध्यांची सूत्रे जागी होती.
परंतु २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीप्रमाणे याहीवेळी पक्ष झोपल्याचे निदर्शनास आलेलं आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे दिग्गज नेते आलेले असून त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे हे बंड शरद पवार यांच्या संमतीने झालेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत सहभागी- अजित पवार
इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.