पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडूनच बालभारतीची पुस्तके, लवकरच नवी कोरी पुस्तक वितरित होणार

0
1

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहे. पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडलेल्या पुस्तकांची पहिली झलक ‘एबीपी माझा’ वर पाहता येणार आहे. यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2023-24 पासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही!
पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीने ही नवी कोरी पुस्तक तयार केली असून पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडे, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पानं जोडली गेली आहेत. ‘माझी नोंद’ या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर विद्यार्थ्यांना लिहिता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही. शिक्षक जे शिकवतील त्याच्या नोंदी आता याच पुस्तकाला जोडलेल्या पानांवर करायच्या आहेत.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

एका विषयच्या पुस्तकाची चार भागांमध्ये विभागणी
हे एकात्मिक पाठ्यपुस्तक असून एकाच पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारे सर्व विषय असणार आहे. सोबतच यामध्ये एका विषयाचे पुस्तक चार भागांमध्ये विभागले गेले आहे. 15 जूनपासून शाळा सुरु होणार असून पहिल्या दिवसापासून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल.

बुक डेपोमध्ये पुस्तके वाढीव दराने मिळण्याचा अंदाज
सध्या तरी शाळांमध्ये ही पुस्तके दिली जात असल्याने पुस्तकांवर ‘विनामूल्य वितरणासाठी’ लिहिले असले तरी बुक डेपोमध्ये जेव्हा हे पुस्तक येतील तेव्हा त्याच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पुस्तकांच्या किमतीमध्ये त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आणि खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करुन त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात याव्यात आणि सदर पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने पुस्तकांच्या सध्या असलेल्या किमतीत यामुळे वाढ होणार आहे. या वाढीव किमतीचा बोजा पाठ्यपुस्तक मंडळावर पडू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून सदर वाढीव किमतीची प्रतिपूर्ती करण्यात येईल.