टीव्ही इंडस्ट्रीने गेल्या दोन दिवसांत एकामागोमाग एक तीन कलाकार गमावले आहेत. छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. वैभवी उपाध्यायच्या अपघाताच्या बातमीनंतर आता ‘अनुपमा’ अभिनेता नितेश पांडेबद्दल वाईट बातमी समोर आली आहे. ‘बधाई दो’, ‘दबंग २’ सारख्या चित्रपटांपासून ते ‘अनुपमा’ सारख्या टॉप टीव्ही शोपर्यंत, अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकलेले अभिनेते नितेश पांडे यांचे निधन झाले आहे.आ नितेश पांडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नितेश पांडे ५१ वर्षांचे होते. सदर घटना काल रात्री घडली. टीव्ही अभिनेत्री सुरभी तिवारीने या संदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी माझा दिग्दर्शक सिद्धार्थ नागरची पोस्ट पाहिली. माझा विश्वास बसत नसल्याने, त्यांना फोन केला. मी त्यांना विचारले की, सर ही काय बातमी आहे, माझा विश्वासच बसत नाहीये.’ अभिनेत्री म्हणाली की, त्यांना हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? कारण ते पूर्णपणे तंदुरुस्त होते. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
नितेश पांडे यांनी ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी या मालिकेत धीरजची भूमिका साकारली होती. केवळ मालिकाच नव्हे, तर शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ मधील त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठीही नितेश कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. नितेश पांडे यांनी १९९०मध्ये थिएटरपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९९५मध्ये त्यांना ‘तेजस’ या शोमध्ये पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. यामध्ये ते एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसले होते.
नितेश यांनी ‘बधाई दो’, ‘रंगून’, ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’, ‘एक प्रेम कहानी’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्येही काम केले आहे.