राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहेत. जयंत पाटील पक्षावर नाराज आहेत, ते भाजपमध्ये जातील किंवा अजित पवारांसोबत जातील; असं बोललं जात आहे.त्यातच त्यांनी शुक्रवारी बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली.






शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. त्या विधानामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पाटील म्हणाले होते की, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. या विधानानंतर शुक्रवारी पुन्हा जयंत पाटील बारामतीला गेले आणि शरद पवारांची भेट घेतली.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी नाराज नाहीये. मला बाहेर बोलायची चोरी झालीय. मी भाषण केलं होतं, ते काढून बघा. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता, त्यांच्यासमोर भाषण करताना सांगितलं की, कालांतराने मोबदला वाढला तर लोक मावेजा घेतात आणि गप्प बसतात. तुम्ही शेवटपर्यंत ठाम आहात का? राजू शेट्टींनी हे आंदोलन हातात घेतलं म्हटल्यावर काही विषय नाही. आंदोलनाला पाठिंबा आहे, हीच भावना होती.
पाटील पुढे म्हणाले की, माझ्या भाषणातून मी नाराज आहे आणि पक्ष बदलणार असं म्हटलं जात आहे. एका तासामध्ये मी त्यावर स्पष्टीकरण दिलेलं होतं. प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की मला कुठेतरी ढकलायचं. आमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या कमी असली तरी पवारांवर प्रेम असलेले लाखो लोक आहेत. जो काही पक्षाच्या हिताचा निर्णय आहे, तो आम्ही एकत्रित मिळून घेऊ.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी बोलताना जयंत पाटील हे सर्वांनाच हवेहवेसे वाटतात, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, राजकारणामध्ये मी सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवले आहेत. पवार साहेबांकडून मी ते शिकलो आहे. त्यामुळे मी सर्वांना हवाहवासा वाटतो, त्यात गैर काही नाही.











