संतोष देशमुख खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ज्या नेत्यांनी देशमुख खून प्रकरणात आवाज उठवला, त्यांच्याशी संबंधित लोकांचे जुने व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यात सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याने ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला मारहाण केली होती, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर खिंडकर पोलिसांना शरण आला.






शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी दादा खिंडकरवर गंभीर आरोप केले होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले होते. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित यांनीच दादा खिंडकरच्या गुन्हेगारी कृत्याला बळ दिलं, असा आरोप सातपुते यांनी केला होता. शिवाय खिंडकरच्या कुटुंबाविषयी आणि संतोष देशमुख खून प्रकरणाविषयीसुद्धा भाष्य केलं होतं.
परमेश्वर सातपुते यांना धनंजय देशमुख यांनी चोख उत्तर दिलं असून दादा खिंडकरने ओंकार सातपुतेला का मारलं, याचाही खुलासा केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, याबाबतीत आम्ही एक शब्दही बोलणार नव्हतो. खिंडकर यांनी परवाच पत्रकारांना सांगितलं होतं की, ते प्रश्न गावातले आहेत. संतोष देशमुख यांच्या न्यायाचा मुद्दा भरकटला नाही पाहिजे. त्यामुळे आम्हीदेखील या विषयात बोललेलो नाही. काल पहाटे तीन वाजता केस झाली. त्यानंतर ते ११ वाजता खिंडकर हजर झाले. त्यामुळे तो विषय संपला होता. परंतु त्यानंतर परमेश्वर सातपुते यांची जी पत्रकार परिषद झाली, त्यातही आमचा काही रस नाही.
देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एवढं आंदोलन पेटलेलं असताना आणि सगळे न्यायाच्या भूमिकेत असताना सातपुते यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यांनी या मुद्द्याच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यांनी मोठी चूक केली आहे. दादासाहेबांबद्दल बोलताना त्यांनी, लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित केले. बीडला दत्त मंदिरामध्ये लग्न झालं होतं, पत्रिका छापलेल्या होत्या. तरीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. मी व्हॉट्सअॅपवर त्यांना विचारलेलं आहे. ते विचार करुन बोलले नाहीत.
दादा खिंडकर यांनी केलेल्या मारहाणीबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, कुणीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. जशी केस पुढे जाईल, तसं सगळ्या गोष्टी पुढे येतील. दीड वर्षांपूर्वीचं प्रकरण उकरुन काढलेलं आहे. दादा खिंडकर यांनी तीन महिन्याच्या कालावधीत न्यायाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट केलेली नाही. मी पोलिसांना याबाबत बोललो आहे. दादा खिंडकरच्या पत्नीला ओंकार सातपुतेने शिव्या दिलेल्या होत्या, चुकीचं बोलला होता, त्या कारणामुळे हे भांडण झालेलं होतं, हे मला प्रथमदर्शनी कळतंय. तपासामध्ये आणखी खुलासे होऊ शकतात.
देशमुख पुढे म्हणाले, परमेश्वर सातपुते यांनी संतोष अण्णांचा विषय बोलायला नव्हता पाहिजे. कुठलंही कुठे कनेक्शन जोडण्याचं काम सातपुते यांनी केलं आहे. माझे साडू आणि मेव्हणीविषयी जे काही बोलले आहेत, त्याबद्दल आम्ही जाब विचारणार आहोत. यानंतर पुन्हा अशा पद्धतीने नाव घेतलं तर आम्ही बोलू देणार नाहीत. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले आहेत, ते आता पुढे आलेलं आहे. महिलांच्या आडून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सातपुते केलेला आहे. त्यांनी पीडित कुटुंबाला मध्ये आणलं आहे आणि या गावच्या लेकीविषयी चुकीच्या पद्धतीने बोलले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत.











