धक्कादायक! पोलिस ठाण्यालगत झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून खून

0

शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा (वय 50) डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लातुरतील एका संशयीत व्यक्तीला (वय 55) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, मयत अनोळखी व्यक्ती ही मानसिक स्थिती बरी नसलेला असून, तो दिवसभर भिक्षा मागून पोट भरत होता. दरम्यान, तो रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यालागत असलेल्या फुटपाथवर एका टपरीच्या आडोशाला झोपत होता. शुक्रवारी पहाटे रात्री 2 ते 5 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत मोठा दगड झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या काही नागरिकांना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी ठाण्याबाहेर येत पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत, पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

जागेच्या कारणावरून क्षुल्लक वाद; काढला काटा…

लातुरतील प्रकाशनगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु असून, त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. मयत आणि मारेकरी हे दोघेही मनावर परिणाम झालेले असून, भिक्षा मागून चरितार्थ चालवितात. फुटपाथवर झोपण्याच्या जागेच्या कारणावरून त्याच्यात क्षुल्लक वाद झाला होता. हा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री झोपलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याने पळ काढला, असे पोलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

चार दिवसामध्ये घडल्या दोन घटना…

चार दिवसांपूर्वी झोपलेल्या एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची घटना औसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेतील व्यक्ती हा भिक्षा मागून जगत होता. यातील संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच लातुरात पोलिस ठाण्यालागच्या फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचाही डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.