नाना पटोले यांची एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला

0

आज धुळवडीच्या मुहुर्तावर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रि‍पदाची खुली ऑफर दिली आहे. “आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. वेळ आली तर, सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदाची जी शर्यत सुरू आहे, तर एकाला काही दिवस आणि एकाला काही दिवस, असे दोघांनाही मुख्यमंत्री करू. ते भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही त्या दोघांनाही आलटून-पालटून कशा प्रकारचे मुख्यमंत्री बनवायचे, ते बनवायचा निर्णय घेऊ,” असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले होते. यावर आता भारतीय जनतापक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत पटोले यांना टोमणावजा सल्ला दिला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत या तुम्हाला मुख्यंत्री करतो, अशी ऑफर देण्यात आली आहे? असे विचारले असता, बावनकुळे म्हणाले, “नाना पटोले यांना होळीच्या दिवशी चांगला सल्ला आहे. विरोधी पक्षाचे मॅन्डेट आहे. विरोधीपक्ष म्हणून पाच वर्ष काम करा. पुन्हा जनतेचा विश्वास मिळवा आणि जनतेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवा. हेच त्यांच्यासाठी योग्य आहे.” बावनकुळे पत्रकारांसोबत बोलत होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, “अशा ऑफर्स वैगेरे महायुतीचे कुणी नेते ऐकत नाही. आमच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या डबल इंजिन सरकाचा १४ कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प आहे. आम्ही विकासाला पुढे नेण्यासाठी काम करत आहोत. अशा ऑफरसाठी काम करत नाही.” एवढेच नाही, तर “त्यांनी विरोधीपक्षात राहून सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात आणि विकासासाठी मदत करावी. आज होळीच्या दिवशी, सर्व मनभेद मतभेद बाजूला सारून आपण एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेऊया, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“मनातून काही जात नाही…”

नुकतेच अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी बोलताना, “गेल्यावेळी आम्ही तिघे होतो, आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. यावर, अजितदादांनी “मनातून काही जात नाही ते…”, असे विधान केले होते. तेव्हा पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.