ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. वाहन चालकांना अधिक फायदा मिळावा यासाठी ही योजना आणण्यात आली असून सध्या दिल्ली आणि गुजरातमध्ये ही सेवा सुरू आहे. पुढील काळात ही सेवा देशभरात सुरू करण्याची तयारी आहे. मेट्रो शहरांपासून ते इतर शहरांपर्यंत ओला, उबर आणि रॅपिडोला टक्कर देण्यासाठी भारत टॅक्सी मैदानात उतरली आहे.






भारत टॅक्सी म्हणजे काय?
भारत टॅक्सीभारताची ही पहिली सहकारी टॅक्सी सेवा आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनने मिळून हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मचं संचालन मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्हमार्फत होतं. यात ड्रायव्हर्स ‘सारथी सदस्य’ असतात आणि तेच हिस्सेदारही असतात. त्यामुळे नफा-तोटा, धोरणे आणि निर्णयांमध्ये त्यांचा थेट सहभाग असतो.
भारत टॅक्सी कशी काम करते?
भारत टॅक्सी अॅप ओला-उबरप्रमाणे GPS-आधारित आहे. यात रिअल-टाइम ट्रॅकिंग, भाडे, SOS बटण, ट्रिप शेअर, UPI/कार्ड पेमेंट, विविध भाषा अशा सर्व सुविधा आहेत.
यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात, इतर अॅप्सप्रमाणे प्रत्येक राइडवर कमिशन न घेता, येथे ड्रायव्हर फक्त एक छोटी सब्सक्रिप्शन (सदस्यता) फी भरतात आणि त्यानंतर संपूर्ण भाडे त्यांच्याकडेच राहते.
यातून प्रवाशांना काय फायदा?
अॅपमध्ये आपल्या प्रवासाचे ट्रॅकिंग, पोलिस इंटिग्रेशन, SOS बटण, 24×7 सपोर्ट आणि तक्रार निवारणाची सोय दिली आहे. विशेष बाब म्हणजे जास्त मागणी असली तरी भाडे कृत्रिमरीत्या वाढणार नाही. भाडेही स्थिर आणि पारदर्शक ठेवलेले आहे.
भारत टॅक्सीमध्ये ड्रायव्हर कसे रजिस्टर करतात?
Google Play Store वरून ‘Bharat Taxi Driver’ अॅप डाउनलोड करा.
मोबाइल नंबर टाकून OTP द्वारे रजिस्ट्रेशन करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा – ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाची RC अनिवार्य आहेत. परमिट, इन्शुरन्स, फिटनेस, PUC इत्यादी काही कागदपत्रे अनेक ठिकाणी ऐच्छिक ठेवली आहेत.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हर राइड घेण्यास सुरुवात करू शकतात.













