सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.






तसेच या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा या लोकांचा डाव आहे का? हे तपासले पाहिजे. त्यासाठी सरकारने पहिली कारवाई करणे आवश्यक आहे, म्हणजे पुन्हा छत्रपतींविषयी वादग्रस्त बोलण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
ते म्हणाले, ”त्यांनी हे वक्तव्य का केले, कुठल्या कारणांसाठी केले? याच्या खोलात गेलं पाहिजे. ते स्वत: कलाकार असून, त्यांना वाटतं की आम्हालाच समाजातील सगळं कळतं. तुम्हाला एवढे कळत असले तरी छत्रपतींच्या इतिहासाविषयी त्यांनी भाष्य करायला नको होते. त्यांचे स्क्रीनवर बिनधास्तपणे बोलणं म्हणजे अति झाले आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मराठी माणूस व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.”
महापुरुषांवर वादग्रस्त विधान करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलेल्या संदर्भाविषयी इतिहासात कुठेही असा उल्लेख दाखविलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले यामध्ये त्यांचा मुत्सद्दीपणा होता, हे दिसून येतो. त्यामुळे सोलापूरकर यांचे हे बोलणे अशोभनीय आणि निंदनीय आहे. काहीतरी बोलायचे आणि राज्य अशांत करायचे, हा सगळा खेळ चाललेला आहे, असे मला वाटते, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
सरकारने एकदा तरी कुणावर कारवाई करून एक उदाहरण घडविले पाहिजे. म्हणजे उद्या छत्रपतींविषयी वादग्रस्त बोलण्याचे कोणी धाडस करणार नाही.
-शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य











