राजकीय चमकोगिरी भोवली! अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी तब्बल ७१ जणांवर पोलिसांकडे तक्रारी दाखल पण २७ जणांवर गुन्हे दाखल

0

पुणे शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली- बोळांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर उभारल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा देताच खडबडून जागे झालेल्या आकाशचिन्ह विभागाकडून मागील दोन दिवसांत तब्बल ७१ जणांविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील २७ जणांवर शहर विद्रूपीकरण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली, तसेच ही कारवाई पुढेही नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सण- उत्सवांची संधी साधत सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून फ्लेक्सबाजीचा उच्छाद वाढला आहे. वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा, नियुक्त्या आणि विविध कार्यक्रमांच्या फ्लेक्सने शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे व्यापली आहेत. महापालिकेकडून यावर कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचे माध्यमांनी निदर्शनास आणून दिले होते. निवडणूक तोंडावर असूनही अनधिकृत फ्लेक्सबाजीवर कारवाई न झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्याची दखल घेत अनधिकृत फ्लेक्सबाजीवर दररोज किमान पाच गुन्हे दाखल करावेत, तसेच फ्लेक्सचे सांगाडे तुकडे करून जप्त करावेत, असे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले होते. त्यानुसार शहरात मोठ्या प्रमाणात बोर्ड आणि फ्लेक्स काढण्यात आले असून, जाहिराती लावणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या कारवाईत…….

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ६

औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने ४

कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालयाने २

वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने ३

कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने १

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने ४

तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा