राज्यातील अनेक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी करत आहेत याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये नेते, पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळजे गटाचे आशुतोष निकाळजे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी या सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत केले.






यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, खरी देशभक्ती अन् खरं हिंदुत्व काय आहे? हे आपल्याला सर्वांना समजावून सांगण्याची गरज आहे. काही जणांच्या डोळ्यांवर पट्टया बांधल्या गेल्या आहेत. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना म्हणाले की संघर्षाच्या काळात खरी शिवसेना काय आहे हे तु्म्ही दाखवून देत आहात याचा मला अभिमान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, शहरातील अनेक रस्ते चौक बॅनरनी बरबटून टाकले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले अन् स्वागत कोण करतंय आपले उपमुख्यमंत्री, अरे बाबा तिथपर्यंत पोहचलास का बोललास का? त्या बॅनरकडे पाहून असं वाटतं की ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच मिंधे सेनेत प्रवेश केला की काय ? असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
जाहिरातबाजीची ही सगळी धूळफेक सुरु आहे. कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही, लोक स्वत:हून दाद देतात. कामाची दखल घेतात. पण ती वृत्ती यांच्याकडे राहिली नाही त्यामुळेच यांना पोस्टरबाजी करायची आहे. असा घणाघात ठाकरेंनी केला.











