गेल्या काही दिवसांपासून सर्वतोमुखी चर्चा असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुन झाली, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला. काहीवेळापूर्वीच ते स्वत:हून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले. त्यामुळे वाल्मिक कराड यांचा शोध संपला असला तरी यानिमित्ताने एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.






सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस काम करत असूनही त्यांना वाल्मिक कराड यांचा शोध लागला नव्हता. अखेर वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादा आरोपी 23 दिवस राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला सहजपणे गुंगारा देता आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो, ही पोलीस दलाच्यादृष्टीने शरमेची आणि चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कोणताही गुन्हा नाही. त्यांच्याविरोधात केवळ पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्याप्रकारे करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाल्मिक कराड यांच्याविरोधात खंडणीचा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचा तपास बीड पोलिसांकडेच आहे. मात्र, तरीही वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठी सीआयडीचा पर्याय का स्वीकारला, याची चर्चा आता रंगली आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. गेली अनेक वर्षे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची आणि नियोजनाची सूत्रे सांभाळत आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही धोक्यात असल्याची चर्चा आहे.











