अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्व पत्नी सुझान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. घटस्फोटानंतरही या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. इतकंच नव्हे तर दोघं आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. एकीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर दुसरीकडे सुझान ही अर्सलान गोणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हृतिक आणि सुझान यांचं एकमेकांच्या पार्टनरसोबतही चांगलं नातं आहे. आता हे सर्वजण वर्षाच्या अखेरीस एकत्र सुट्टीवर गेले आहेत. या व्हेकेशनचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.






सुझान खानने नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये हृतिक, सुझान, अर्सलान आणि सबा हे सर्वजण एकत्र एंजॉय करताना दिसत आहेत. यावेळी हृतिक आणि सुझानची मुलंसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. काहींनी त्यांच्या नात्याचं कौतुक केलंय. तर काहींनी ‘हे सर्व काही पटत नाही’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मुलांसमोर हे वागणं योग्य असल्याचं दाखवणाऱ्या हृतिक-सुझानला लाज वाटली पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही आपली भारतीय संस्कृती नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘एकमेकांचे एक्स सोबत पार्टी कसं करू शकतात? तेसुद्धा आताच्या पार्टनरसोबत. हे सर्व खूपच चुकीचं दिसतंय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
हृतिक आणि सुझान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. 2014 मध्ये हृतिक आणि सुझान हे अधिकृतरित्या विभक्त झाले. हृतिक-सबा, सुझान-अर्सलान यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्याबद्दल सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खानने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “आमचं कुटुंब हे प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘मॉडर्न फॅमिली’सारखंच आहे. आम्ही जणू नव्या मॉडर्न फॅमिलीसारखंच आहोत. आमच्यात खूप वेडेपणा आहे. इथे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा स्वीकार मनमोकळेपणाने करतो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला निश्चितच आम्हाला थोडा वेळ लागला. पण आता आम्ही सर्वजण एकत्र खुश आहोत. ही खूप सुंदर भावना आहे. आम्ही सर्वजण एकत्र पार्टी करतो, मजामस्ती करतो, नाचतो”, असं तो म्हणाला होता.











