नवी दिल्ली: भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या सुदर्शन चक्राने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. रशियन बनावटीच्या एस 400 या क्षेपणास्त्र विरोधी हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यावर पाणी फेरलं.
भारतीय हवाई दलाने काल रात्री देशाच्या हवाई सुरक्षेच्या इतिहासात अत्यंत निर्णायक पाऊल उचलले. S-400 ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या मदतीने भारताच्या दिशेने हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करत त्यांना यशस्वीरित्या निष्प्रभ करण्यात आले, अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी ANI या वृत्तसंस्थेला दिली आहे.
हल्ला झालेल्या लक्ष्यांचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नसला, तरी ते संभाव्य घातक आणि भारताच्या सीमावर्ती सुरक्षेला धोका पोहोचवणारे होते, असे मानले जात आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. एक किंवा अधिक क्षेपणास्त्रे, हवाई हल्ले वेगाने भारताच्या दिशेने सरकत होती.
दरम्यान, या मोठ्या संरक्षण कारवाईबाबत अधिकृत शासकीय पुष्टी अद्याप आलेली नाही, मात्र सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर स्रोतांच्या माहितीनुसार, ही यशस्वी कारवाई भारताच्या हवामानात अचूकतेने कार्य करणाऱ्या S-400 प्रणालीमुळे शक्य झाली.
S-400 ‘सुदर्शन चक्र’ ही भारताने रशियाकडून खरेदी केलेली अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी 400 किमी अंतरावरूनही लक्ष्य भेदू शकते. सध्या भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेत ही प्रणाली एक ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
S-400 हवाई संरक्षण प्रणाली ही भारताच्या लष्करी सज्जतेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या करारानंतर भारताने तब्बल 5 अब्ज डॉलर्समध्ये ही प्रणाली विकत घेतली. यातील काही युनिट्स भारतात आधीच दाखल झाल्या आहेत आणि संवेदनशील सीमावर्ती भागांमध्ये तैनातही करण्यात आल्या आहेत.
ही प्रणाली 40 किलोमीटर ते थेट 400 किलोमीटरपर्यंत कुठल्याही हवाई हल्ल्याचा सामना करू शकते. एवढंच नव्हे तर, अमेरिकेचा ‘अदृश्य’ समजला जाणारा F-35 फायटर जेटही S-400 च्या टप्प्यातून सुटू शकत नाही, असं मानलं जातं.